सोंगाडे

0
98
  • दत्ताराम प्रभू-साळगावकर

दुसर्‍या दिवशी पण तेच! बाहेर पडायला उशीर; बस चुकली! पुढचे आणखी दोन दिवस प्रकार तोच… म्हणेपर्यंत पाहुण्याचा मुक्काम दहा दिवस झाला. नातेवाईकांना ‘वास’ आला; बस चुकत नव्हती, मुद्दामच चुकवली जात होती! मग त्यांनी प्लॅन केला….

आमच्या लहानपणी आम्ही आमच्या गावात कधी-कधी येणारे बहुरूपी पाहिले आहेत. गावात त्यांचा मुक्काम सुमारे आठवडाभर असायचा. रोज वेगवेगळी सोंगं ते करायचे व बाजारपेठेत फिरायचे. बाजारपेठ मोठी होती. शंभरहून जास्त दुकानं होती. शेवटचं सोंग आणायचे ते पोलीस इन्स्पेक्टरचे किंवा इन्कमटॅक्स ऑफिसरचे. प्रत्येक दुकानदारावर कसला तरी आरोप ठेवायचे व दुकानदाराला दंड सुनवायचे. दुकानदार पाच-दहा रुपये देऊन त्यांची बोळवण करायचे. हाच त्यांचा पैसे कमवायचा धंदा; भिक्षा मागण्यापेक्षा थोड्या वेगळ्या तर्‍हेने पैसे मिळवण्याचा! त्यांची वेगवेगळी सोंगं पाहून त्या वयात आमची करमणूक व्हायची. अलीकडच्या काळात असले बहुरूपी दिसले नाहीत. कदाचित त्यांचा धंदा ‘बसला’ असावा!
पण सोंगाडे मात्र जरूर दिसतात… उगाच कसलातरी आव आणायचा, सोंग करायचं व काम साधायचं. असाच एक मनुष्य होता…
घरची परिस्थिती जेमतेम. शाळेत सारखा गेला नाही. घरीसुद्धा कोणी त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मोठी मंडळी पैसे मिळवून घर चालवण्याच्या सदोदित विवंचनेत; त्याच्याकडे लक्ष कोण देणार? ढकलत ढकलत कसाबसा सातवी-आठवीपर्यंत गेला; त्यानंतर शाळेचं तोंडच बघितलं नाही. शाळा सोडली आणि गावात कुचाळक्या करत फिरू लागला. वरून वेडेपणाचं सोंग. लोकांनी त्याचं नाव ठेवलं- ‘आवटो’ म्हणजे वेडा! घरी आयतं गिळायला मिळत होतं मग तो कष्ट तरी कशासाठी करेल? कसंतरीच वागणं, काहीतरीच बोलणं असंच चालू. चार पैसे जोडण्याचा विचार नाही की घरच्या परिस्थितीची जाणीव नाही. शेजारी-पाजारी, ओळखीचे कोणी उपदेशाचे चार शब्द ऐकवायचे. सांगायचे की, ‘पोटापाण्याचा काहीतरी विचार कर. घरचं फुकटचं खातोस व गावात वेडपटासारखा फिरतोस ते बंद कर. घरी खायला मिळतं तोपर्यंत ठीक, त्यानी उद्या तुला घराबाहेर काढलं तर जाशील कुठं? उपाशी मरशील!’ पण परिणाम शून्य; वरून गायचा की ‘आम्ही काय कुणाचं खातो? तो राम आम्हाला देतो!’ बस्स! तो जेव्हा कोणाचंच ऐकेना तेव्हा त्यानी त्याच्या घरच्यांना सांगायला सुरुवात केली की, ‘त्याला फुकटचं खायला देऊ नका, ऐतखाऊ बनतोय तो. चार पैसे कमवायचा मार्ग सांगा.’ घरच्यांनी त्याला परोपरीनं सांगून पाहिलं, त्याच्यावर रागावून पाहिलं, आज ऐकेल- उद्या ऐकेल म्हणून आणखी थोडे दिवस थांबले पण परिणाम शून्य! नाईलाजाने त्यांनी पर्याय शोधला की त्याला उद्यापासून घरातलं जेवण, चहाचा एक कपसुद्धा बंद. आठ-दहा दिवस असे गेले. त्याच्या ओळखीचे कोणी त्याला चार-आठ आणे द्यायचे, पण त्यानी पोट कसं भरेल? परिणाम योग्य तोच झाला. भूक स्वस्थ बसू देईना!
पदरी शिक्षण नाही, जड काम करायची सवय नाही व हिम्मतही नाही. शेवटी एका हॉटेलवाल्याला त्याची दया आली. हॉटेलात कपबशा धुवायचं काम दिलं; पण त्याबरोबर तंबीही दिली- ‘एकसुद्धा कप किंवा बशी फुटली तर पगारातून पैसे कट!’ पोटापाण्याची सोय झाली व हॉटेलमालकानं हॉटेलात राहायला जागा पण दिली. कामं मिळालं पण घरचं अन्न मिळत नव्हतं. हॉटेलमालक जे काय खायला घालणार तेवढंच. मालकाच्या भीतीनं काम व्यवस्थित करू लागला. कसाकाय असेना, पण थोडा मार्गी लागला, ते पण घरातून बाहेर काढलं म्हणून! एक-दोन महिन्यांनी घरच्यांनी त्याला घरी बोलावलं. त्याच्यात झालेल्या सुधारणेमुळे रात्रीचं जेवण द्यायला सुरुवात केली. पण अट अशी की मालक महिन्याकाठी जे पैसे देतो त्यातले अर्धे घरखर्चासाठी द्यायचे. त्यानं मान्य केलं. ‘आवटी’पणाचं सोंग घेतलं होतं ते फसलं. पण लोकांनी ठेवलेलं ‘आवटो’ हे नाव मात्र उरलं ते उरलंच!
असाच आणखी एक महाभाग. सोंगाड्या कदाचित नसेल पण सोंगाड्यासारखा. एका खेडेगावात त्याच्या- म्हटले तर जवळचे, म्हटले तर दूरचे- नातेवाईकांचे घर होते. घरात नवरा, बायको व एक मुलगा. बरीच वर्षं त्याला त्या नात्याची आठवण झाली नसावी. पण कसल्यातरी कारणानं त्याचं त्या नातेवाईकांच्या घरी येणं झालं. नातेवाईक कुटुंब सुखवस्तू होतं. त्यांच्याकडे दोन दिवस राहाणं झालं. ऊठ-बस, आदरातिथ्य चांगलं झालं. निरोप घेताना त्याला ते नातेवाईक म्हणाले की, असेच येत-जात रहा.
पुढल्या वर्षी आंबे-फणसांच्या मोसमात तो गृहस्थ पुन्हा त्यांच्याकडे आला. चार दिवस मजेत राहिला. पाहुणचार झोडला व निघून गेला. पुढल्या वर्षी पुन्हा तेच. नातेवाईकांना वाटले, दोनचार दिवस राहील व निघून जाईल. पण चार दिवस होऊन गेले तरी निघायची, हलायची चिन्हे नाहीत. पाचव्या दिवशी ‘उद्या निघायला हवं’ असं म्हणाला. गावातून शहराकडे जायला सकाळच्या दहा वाजेपर्यंत बसेस होत्या. त्यानंतर होत्या त्या दुपारच्या दोननंतर. दहापर्यंतच्या बसनं निघाला तरच तो आपल्या घरी सायंकाळपर्यंत पोहोचेल एवढं दूर त्याचं घर होतं. ज्या दिवशी तो निघतो म्हणाला त्या दिवशी काही कारणानं निघायला दहा वाजून गेले व ती बस चुकली. अर्थात मुक्काम एका दिवसानं वाढला. दुसर्‍या दिवशी पण तेच! बाहेर पडायला उशीर; बस चुकली! पुढचे आणखी दोन दिवस प्रकार तोच… म्हणेपर्यंत मुक्काम दहा दिवस झाला. नातेवाईकांना ‘वास’ आला; बस चुकत नव्हती, मुद्दामच चुकवली जात होती! त्यानी प्लॅन केला. आपण तिघांनीही दहाच्या बसने निघायची तयारी करायची व त्याला त्याची पूर्वसूचना दिली. सर्वजण सकाळी लवकर उठले. पाहुणा पण उठला. नऊ वाजेपर्यंत चहापाणी उरकलं. साडेनऊलाच तयारी करून निघायला सिद्ध झाले. बसस्टॉप घराजवळच होता. दहाला दहा मिनिटं असतानाच पाहुण्याला स्टॉपवर पाठवलं, ‘आम्ही पाच मिनिटात येतो’ असं सांगून! पाहुणा खरंच समजला. दहाच्या ठोक्याला फक्त यजमान तेवढे बसस्टॉपकडे आले व म्हणाले, ‘आम्ही या बसनं येत नाही, दुपारच्या बसनं जाणार.’ एवढं बोलणं होईपर्यंत बस आलीच. बसला हात दाखवला व पाहुण्याला बसमध्ये चढावंच लागलं.
बिच्चारा!!
बसमध्ये बसला व निघून गेला. सोंगाड्याचं सोंग उतरवलं! आपल्याला ‘गंडवलं’ हे पाहुण्यानं जाणलं असणार निश्‍चितच! पुढल्या वर्षी व त्यानंतर तो आलाच नाही.
पाहुण्याच्या ‘बस चुकवण्याच्या’ सोंगाला, ‘सर्वजण निघणार’ अशा सोंगानंच निरोप दिला!