सेरेना, थिम उपांत्यपूर्व फेरीत

0
298

>> द्वितीय मानांकित सोफिया केनिनचे आव्हान संपुष्टात

अमेरिकेची तृतीय मानांकित सेरेना विल्यम्स व ऑस्ट्रियाच्या द्वितीय मानांकित डॉमनिक थिम यांनी यूएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. सेरेनाने १५व्या मानांकित ग्रीसच्या मारिया सक्कारी हिला तीन सेटमध्ये ६-३, ६-७ (८), ६-३ असे पराजित केले. पुढील फेरीत सेरेनाचा सामना बल्गेरियाच्या स्वेताना पिरोंकोवा हिच्याशी होणार आहे. पिरोंकोवाने फ्रान्सच्या बिगरमानांकित ऍलिझ कॉर्नेट हिला ६-४, ६-७, ६-३ असा धक्का दिला.

डॉमनिक थिमला चौथ्या फेरीत कॅनडाच्या फेलिक्स आगुर ऍलिसिम याला नमविण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागली नाही. पहिला सेट टायब्रेकरमध्ये ७-६ (४) असा जिंकल्यानंतर थिमने पुढील दोन्ही सेट ६-१, ६-१ असे जिंकत आगेकूच केली. ‘अंतिम ८’मध्ये थिम याच्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या आलेक्स दी मिन्युर याचे आव्हान असेल. २१व्या मानांकित मिन्युर याने चौथ्या फेरीत वासेक पोस्पिसिल याला ७-६, ६-३, ६-२ असे नमविले.
पुरुष एकेरीत तृतीय मानांकित डॅनिल मेदवेदेव याने फ्रान्सच्या फ्रान्सिस तियाफो याला ६-४, ६-१, ६-० असे अस्मान दाखवले तर दहाव्या मानांकित रशियाच्या आंद्रेय रुबलेव याने इटलीच्या सहाव्या मानांकित माटिओ बार्रेटिना याला ४-६, ६-३, ६-३, ६-३ असा बाहेरचा रस्ता दाखवत अंतिम आठमध्ये प्रवेश केला.

महिला एकेरीत अमेरिकेच्या द्वितीय मानांकित सोफिया केनिन हिला चौथ्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. बेल्जियमच्या सोळाव्या मानांकित एलिस मर्टेन्स हिने केनिनला ६-३, ६-३ असे सहज हरविले. बेलारुसच्या अनुभवी बिगरमानांकित व्हिक्टोरिया अझारेंकाने झेक प्रजासत्ताकच्या विसाव्या मानांकित कॅरोलिना मुचोवा हिला ५-७, ६-१, ६-४ असे पराभूत करत आगेकूच केली.

बोपण्णाचे आव्हान संपुष्टात
भारताच्या रोहन बोपण्णा व कॅनडाच्या डॅनिस शापोवालोव यांना यूएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँडस्‌च्या जॉन ज्युनियर रॉजर व रोमानियाच्या होरिया टाकाव या जोडीकडून ७-५, ७-५ असा पराभव पत्करावा लागला. हा सामना १ तास २६ मिनिटे चालला.