कला अकादमी सेरेंडिपीटी कला महोत्सवासाठी उभारण्यात येत असलेल्या एका सेटला आग लागल्याची घटना काल घडली. काल संध्याकाळी 4.30 च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. यावेळी तेथे हजर असलेल्या कामगारांनी ही आग विझवण्याचे प्रयत्न केले. पणजी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर दलाच्या जवानानी व सेरेंडिपीटी स्थळावरील कामगारानी शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझवली. वेल्डिंगचे काम चालू असताना आगीची ठिणगी उडाल्याने ही आग भडकली.
गेल्या वर्षी आयनॉक्स परिसरातही सेरेंडिपीटी महोत्सवासाठी उभारण्यात येत असलेल्या नाट्यगृहासाठीच्या सेटला अशाच प्रकारे वेल्डिंगचे काम चालू असताना आगीची ठिगणी उडाल्याने आग लागून नाट्यगृहासाठीचा सेट पूर्णपणे जळून खाक झाला होता. गेल्या वर्षीही 8 डिसेंबर रोजीच सेरेंडिपीटीच्या सेटला आग लागली होती. फरक एवढाच की गेल्या वर्षी आगीची घटना ही आयनॉक्सस्थळी लागली होती, तर यंदा आग कला अकादमीस्थळी लागली.
आयोजकांनी अपघातापासून काहीच बोध घेतला नाही : काकोडे
8 डिसेंबर 2024 रोजी आयनॉक्स कोर्टयार्ड येथे सेरेंडिपीटी आर्ट्स फेस्टिव्हलच्या मंडपाला वेल्डिंगच्या कामामुळे आग लागल्याचा संशय होता. नेमके बरोब्बर एका वर्षानंतर 8 डिसेंबर 2025 रोजी या महोत्सवाच्या कला अकादमीतील मंडपाला त्याच कारणामुळे आग लागल्याचे समोर आले आहे. यावरून स्पष्ट होते की आयोजक व प्रशासनाने गेल्या वर्षीच्या दुर्घटनेपासून काहीही बोध घेतलेला नाही, असा आरोप एक कलाकार व ईएसजीचे माजी सदस्य विशाल पै काकोडे यांनी केला.