सरकारने ई- लिलांव केलेल्या खनिजाची वाहतूक करण्यासाठी काही कंपन्यांना परवानगी दिलेली असून दि. ८ रोजीपासून सेझा गोवा कंपनीने वाघोण येथील खाणीवर घेतलेल्या खनिजाची वाहतूक करण्याची तयारी चालविली आहे. दरम्यान, कंपनीने खनिज वाहतुकीचे काम सर्वांना दिले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ट्रकमालकांनी दिला. वाघोण येथून सदर खनिज मालाची वाहतूक उत्तर गोव्यातील आमोणा येथील कंपनीच्या पीग आयर्न कारखान्यात करण्याचे वृत्त आहे.
दरम्यान, कंपनीने याआधी नोंदणी असलेल्या ट्रकांनाच वाहतुकीसाठी काम देण्याचे ठरविले असल्याचे समजते. कंपनीने किर्लपाल दाभाळ पंचायत क्षेत्रातील काही ट्रकांना या वाहतुकीत सामावून घेण्याचे ठरविले असल्याने इतर भागातील ट्रक मालकांत नाराजी असून कंपनीने त्यांच्याकडे यापूर्वी नोंद असलेल्या प्रत्येक भागातील सर्व ट्रकांना काम द्यावे अशी मागणी होत आहे.
सेझा गोवा कंपनी चालू असताना सुरुवातीस वाघोण ते सावर्डे अशीच खनिज वाहतूक होत होती. त्यानंतर कंपनीने दाभाळ, धारबांदोडामार्गे आमोणा अशी वाहतूक चालू केली होती. कंपनीत या सर्व ट्रकांना समान काम देण्याची व्यवस्था करणे आवश्यक असून गेल्या दोन वर्षांपासून खनिज वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने सर्वच ट्रकमालक विवंचनेत आहेत, त्यामुळे ी कंपनीने आपली खनिज वाहतूक चालू केल्यास एक दिवस किर्लपाल दाभाळ पंचायत क्षेत्रातील व त्या भागातील ट्रकमालकांना वाहतुकीसाठी सामावून घ्यावे व एक दिवस सावर्डे-कुडचडे भागातील ट्रकमालकांना घ्यावे असे ट्रकमालकांचे मत आहे. मात्र उपलब्ध माहितीप्रमाणे फक्त किर्लपाल दाभाळ, धारबांदोडा या भागातील सेझा गोवा कंपनीत नोंद असलेल्या ट्रकांनाच वाहतूक करण्याचे काम देण्याचे कंपनीने ठरविले आहे.
पॅकेज जाहीर होत नसल्याने ट्रकमालक विवंचनेत
खाण व्यवसाय २०१२ मध्ये बंद केल्यानंतर गोव्यातील ट्रकमालकांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे ठाकले होते. अशा लोकांचा प्रश्न सुटावा यासाठी सरकारने ट्रक मालकांना ऑक्टोबर २०१२ पासून प्रतिमहिना आर्थिक मदत चालू केली होती. त्यानुसार एक ट्रकमालकाना महिना आठ हजार प्रमाणे आर्थिक मदत चालू केली होती. ही मदत ऑक्टोबर २०१२ ते सप्टेंबर २०१४ पर्यंत होती. आतापर्यंत ट्रक मालकांना काहींना १३ हप्ते तर काहींना १५ हप्ते अशा प्रकारे रक्कम मिळाली असल्याचे कळते. आता सरकारने आश्वासन दिलेले पॅकेज अजून जाहीर झाले नसल्याने पुढे काय या विवंचनेत ट्रकमालक आहेत.