>> जनता दल सेक्युलरच्या बैठकीत निर्णय
देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून, त्यातच कर्नाटकमधील सेक्स स्कँडल प्रकरणाने देशभरात खळबळ माजवली आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आणि खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपांनंतर जनता दल सेक्युलरने (जेडीएस) त्यांचे काल पक्षातून निलंबन केले.
माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी मंगळवारी जेडीएसच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये प्रज्वल रेवण्णा यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात चर्चा झाली. यानंतर त्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सेक्स स्कँडल प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही, तो पर्यंत प्रज्वल रेवण्णा यांचे निलंबन कायम राहणार असल्याची माहिती कुमारस्वामी यांनी दिली.
कुमारस्वामी यांनी पत्रकार परिषद घेत प्रज्वल रेवण्णा यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. एसआयटीचा तपास होईपर्यंत प्रज्वल रेवण्णा यांचे निलंबन कायम राहील. आपण कधीही चूक करणाऱ्याचा बचाव करणार नाही आणि केलेला नाही; पण या वादात माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नाव घेणे चुकीचे आहे, असे मत कुमारस्वामी यांनी व्यक्त केले.
कर्नाटक पोलिसांनी सेक्स स्कँडल प्रकरणाची चौकशी एसआयटीद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष चौकशी पथकाकडून या संदर्भात दाखल तक्रारींची चौकशी करण्यात येणार आहे.