सेंट फ्रान्सिस झेवियर अवशेष दर्शन : आज समारोप

0
97
जुने गोवे येथे गोंयच्या सायबाच्या अवशेष दर्शनासाठी काल उसळलेली गर्दी. (छाया : किशोर स. नाईक)

शेवटच्या दिवशीही भाविकांची प्रचंड गर्दी
जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियरच्या अवशेष दर्शनासाठी कालही दिवसभरात मोठ्या संख्येने भाविकांनी शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दी केली. गोंयच्या सायबाच्या अवशेष दर्शन सोहळ्याचा समारोप आज सकाळी ९.३० वाजता से कॅथेड्रल चर्चमध्ये होणार आहे. यानंतर भव्य मिरवणुकीत हे अवशेष बंद पेटीतून पूर्वीच्या बॉंम जिझस चर्चमध्ये आणण्यात येणार आहे.सलग ४५ दिवस जुने गोवे येथे हा सेंट फ्रान्सिस झेवियर अवशेष दर्शन सोहळा चालू होता. या काळात अंदाजे अडतीस लाख लोकांनी गोंयच्या सायबाच्या अवशेषाचे दर्शन घेतले. काल शेवटच्या दिवशीही भाविकांची प्रचंड गर्दी दिसून आली.
दर १० वर्षांनी अवशेष भाविकांच्या दर्शनासाठी से कॅथेड्रल चर्चमध्ये ठेवण्यात येतात. यंदा यासाठी ४५ दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला होता व येथे कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळितपणे लोकांना, भाविकांच्या त्यांचे दर्शन घेता आले. या काळात पोलिसांचा बंदोबस्त ठिकठिकाणी चोख होता.
आज सकाळी सेंट फ्रान्सिस झेवियरचे अवशेष पूर्वीच्या बॉंम जिझस चर्चमध्ये आणण्यात येणार आहेत. यावेळी गोव्याचे आर्चबिशप, ज्येष्ठ धर्मगुरू, राजकीय नेते मंडळी आदींची उपस्थिती असेल. हा सोहळा पहाण्यासाठी सकाळी येथे मोठी गर्दी असेल. त्यामुळे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.