जुने गोवे येथील चर्चमध्ये सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे वार्षिक फेस्त भक्तिपूर्ण वातावरणात काल साजरे करण्यात आले. या फेस्तानिमित्त पहाटेपासून खास प्रार्थना सभांचे आयोजन केले होते. या फेस्ताला ख्रिश्चन धर्मगुरूंची मोठी उपस्थिती होती. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत मंत्री, आमदार, राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे दर्शन घेतले.
जुने गोवे येथे 45 दिवस चालणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर अवशेष दर्शन सोहळ्याला 21 नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला आहे. त्याचदरम्यान आलेल्या वार्षिक फेस्ताला स्थानिक, देशी आणि विदेशी नागरिकांनी गर्दी केली होती.
गोवा हे शांतता प्रिय राज्य आहे. याठिकाणी हिंदू, ख्रिश्चन आणि इतर धर्मीय एकोप्याने राहतात. आम्ही एकजूट आहोत, हा संदेश सेंट फ्रान्सिस झेवियरच्या फेस्तानिमित्त सर्वत्र पोहोचायचा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केली.