- – मीना समुद्र
एक नवा जीव त्या मातेच्या पोटी जन्मणार असतो. सार्यांशी नाते जोडणारा तो दुवा असतो. हे नवसृजन, हे नवनिर्माण हाच विवाहाचा मुख्य हेतू आणि जग पुढे नेणारी अतिशय महत्त्वपूर्ण साखळी असते. म्हणूनच हा होणार्या मातेचा सृजनसन्मान असतो.
आमच्या एका परिचितांनी फोनवरून अतिशय प्रसन्नपणे त्यांच्या मुलाला कन्यारत्न झाल्याची सुवार्ता दिली तेव्हा सुखद आश्चर्याचा हलकासा धक्का बसला. आश्चर्याचं कारण म्हणजे, डॉक्टरांनी दिलेल्या तारखेच्या १५-२० दिवस आधीच त्या सोनुलीला जग पाहायची घाई झाली होती. बाळ-बाळंतीण सुखरूप आहेत म्हटल्यावर हायसं वाटलं. ‘छान झालं, पहिली बेटी धनाची पेटी’ असं म्हणत त्या आजोबा-आजीचं आणि बाळाच्या आई-बाबाचं फोनवरून अभिनंदन केलं.
दीड महिन्यापूर्वीच मोठ्या हौसेनं आप्तांच्या गोतावळ्यात आणि इष्ट-मित्रमंडळीच्या साक्षीनं धूमधडाक्यात साजर्या केलेल्या डोहाळेजेवणाची आठवण झाली. त्यावेळी पुरीनं झाकलेल्या खीर आणि पेढा यांच्या वाट्यांवरल्या खिरीवरची पुरी त्या पहिलटकरणीनं उचलली होती. खीर उघडली म्हणजे आता मुलगी होणार असा जल्लोष नातेवाईक स्त्रियांनी आणि उत्सुकतेने बघणार्या मुलीबाळींनी केला होता. हा एक गमतीशीर खेळकर प्रकार खरं तर; पण तो पारंपरिक संकेत या कन्येने खरा ठरविला होता. ही आठवण काढून तीन पदवीप्राप्त आजी आणि मी अगदी मनमुराद हसलो. ‘मुलगी झाली हो’ म्हणून गळा काढणार्यांपैकी ते कुटुंब नव्हतंच मुळी; तर कित्येक वर्षांनी त्यांच्या घरी जन्मणार्या बाळीचे ‘मुलगी झाली बरं का’ असे मोठ्या आनंदाभिमानाने सांगणारी ती सुशिक्षित, सुसंस्कारित मंडळी होती. ही सरस्वतीच सोनपावलांनी घरी आल्याचं ती मानत होती. पहिली बेटी सगळ्यांना तुपरोटीच देईल याची त्यांना जाण होती. बाळजन्म हा त्यांच्यासाठी प्रतीक्षेचा, स्वागताचा आणि अत्यंत आनंदाचा क्षण होता म्हणून तर त्यांनी पाचवीपूजनाची वाटही न बघता तातडीने ही बातमी आम्हाला कळविली होती.
अतिशय मनोरम असे पारंपरिक संस्कार करून त्यांनी त्या गर्भवतीचा सृजनसन्मान केला होता. आपल्याकडे पहिलटकरणीचे कोडकौतुक करण्यासाठी कोवळ्या उन्हातले, चांदण्यातले, बागेतले, झोपाळ्यावरचे अशी डोहाळेजेवणे केली जातात. वेगवेगळ्या स्थळांचा आणि काळ-वेळाचा सुसंस्कार त्या गर्भवतीवर आणि गर्भावर होत असतो. तिसर्या महिन्यात गुपचूप भरलेल्या चोरओटीनंतर सातव्या महिन्यात हिरवी साडी-चोळी, हिरवाकंच चुडा लेवविला जातो. केसात, मनगटात, गळ्यात सुवासिक फुले माळली जातात. सुवासिनी ओटी भरून तिचं शुभचिंतन करतात. वडीलमंडळी आशीर्वचने देतात. डोहाळतुलीचं मन प्रसन्न राहावं, कडक डोहाळे असले तर प्रेमाच्या माणसांत आणि स्नेहीजनांच्या संगतीत सुसह्य व्हावं, अवघडलेपण दूर व्हावं, तिचं बाळ निरोगी-सुदृढ निपजावं म्हणून तिच्या खाण्यापिण्याकडे लक्ष पुरवले जाते. तिच्या हालचालींवर ज्येष्ठ स्त्रिया लक्ष ठेवून असतात. तिला मुक्त निसर्गसान्निध्य लाभावे असेही प्रयत्न असतात. तिच्यासाठी खास डोहाळगाणी (डोहाळे) गायली जातात. तिला काय खावे-प्यावेसे वाटते, कोणती हौस करावीशी वाटते, कुठे हिंडावे-फिरावेसे वाटते, काय करावेसे वाटते ते त्या गाण्यातून आणि एरव्हीही विचारले जाते. पुष्पांकित अशा झोपाळ्यावर बसवून झुलविले जाते. चंद्राच्या प्रतिकृतीवर बसविले जाते. नौकाविहार करविला जातो. विंझणवार्याची सोय पाहिली जाते. फुला-पानांनी सजविलेल्या दालनात हा सारा आनंदसोहळा चालू असतो आणि त्यात कौतुकमिश्रित आनंदाने सर्वजण सहभागी होतात. एक नवा जीव त्या मातेच्या पोटी जन्मणार असतो. सार्यांशी नाते जोडणारा तो दुवा असतो. हे नवसृजन, हे नवनिर्माण हाच विवाहाचा मुख्य हेतू आणि जग पुढे नेणारी अतिशय महत्त्वपूर्ण साखळी असते. म्हणूनच हा होणार्या मातेचा सृजनसन्मान असतो.
‘थांब उद्याचे माऊली, तीर्थ पायाचे घेईतो’ अशा ओळीतून कवीने भावपूर्णतेने त्या माऊलीचं पावित्र्य व्यक्त केलं आहे. तिचा सन्मान केला आहे. एका बाळाचा जन्म आई-बाबा, बहीण-भाऊ, आजी-आजोबा, मामा-मामी, मावशी-मावसोबा, आत्या-आतोबा, काका-काकी अशी कितीतरी नाती निर्माण करतो! आते, मामे, चुलत भावंडांची वेगळीच. कालांतराने समवयस्कांची, मित्र-मैत्रिणींचीही दृढ नाती निर्माण होतात. त्यामुळे बाळाचा जन्म हा अतिशय औत्सुक्याचा आणि महत्त्वाचा विषय असतो. बाळ दिसतं कुणासारखं, त्याचा रंग, त्याची पावलं, उंची, वजन याबाबत चर्चा होते. त्याची इवलीशी हालचाल, जांभई, डोळे मिटणं, उघडणं, अंगावरची लव, गालावरची खळी, हातापायाची बोटं, मिटलेल्या घट्ट मुठी, जावळ, केसाचा काळेपणा, बुरेपणा, लासं किंवा तुळशीपत्रासारखी एखादी जन्मखूण, त्याचं पर्यांनी गुदगुल्या केल्यासारखं हसणं… सगळं काही न्याहाळलं जातं. अख्खं घरच त्याच्याभोवती रिंगण घालत असतं. तेच घराचा केंद्रबिंदू बनतं. सगळे त्याच्याच तैनातीत असतात. बाळाची आंघोळ म्हणजे एक स्वतंत्र विषय. आंघोळीपूर्वी तेलाचा सर्वांगाला मसाज करणं आणि मग आईबाबांच्या सवयीप्रमाणे गरम-कोमट पाण्यानं त्याला आंघोळ घालणं, पायावर पालथं घालून डोक्यावर हळूहळू पाणी ओतणं, पूर्वी साबण न वापरता दुधात बेसन मिसळून अंगाला चोळूनमोळून आंघोळ घातली जाई. मग मऊ पंचाने पुसून, अंग धुपवून, कोरडं करून, मऊशा शुभ्र कापडात त्याला गुंडाळून, काजळ-तिटी करून, डोक्यावर टोपडं घालून पाळण्यात अलगद झोपविले जाते. आता अडीच-तीन तासांची निश्चिंती असते. या वेळातच त्याच्या मातामाऊलीची छोटीमोठी कामंधामं आणि विश्रांती! बाळ उठलं की भुकेनं कळवळतं. मग त्याला स्तनपान करणं, शी-सूची दुपटी बदलणं, त्याला जवळ घेऊन उदाधुपाचा वास येणारी त्याची टाळू हुंगणं, त्याला थोपटणं, त्याच्या लीला न्याहाळणं, त्याला अगम्य भाषेत बोलणं, कुरवाळणं, अंगाई म्हणून त्याला झोपवणं… सारं कसं अगदी मनापासून न कंटाळता ती आई करत असते. बाळंतपण म्हणजे बाई माणसाचा दुसरा जन्म असं म्हटलं जातं ते उगीच नव्हे. त्या कळा, त्या वेणा, त्या शारीरिक यातना तिला सहन कराव्याच लागतात मगच ते आनंदाचं गाठोडं हाती येतं. बाळमुख पाहिलं की सार्या दुःख-कष्टांचा विसर पडतो. हे तान्हुले हुंकारते, मान सावरते, कुशीवर वळते, पुढे सरकते, रांगते, वस्तूला धरून उभे राहताना लडखडते, पडते, पुन्हा ‘चाल चाल मोत्ये, पायात मोडले काटे’ असं ऐकत पुढे पुढे जाते. ‘एक पाय नाचिव रे गोविंदा’ म्हटलं की पाय नाचवत घागर्यांचा आवाज करते. काऊ-चिऊचा, काका-मामाचा घास खाते. मोराला तळहातावर बसवून चारापाणी देऊ बघते. हसणं, बोबडे बोल, पहिले दात, पहिलं पाऊल टाकणं, पहिलं जावळ आणि सगळ्याच हालचाली किती लाघवी. बाळामुळेच आपले जीवन सार्थक झाले असे सांगणारी मालवण सा. संमेलनात शिरीष पै यांनी वाचलेली कविता हाती आली ती अशी-
बाळ जन्मले तेव्हा, मीही फिरून जन्मले
बाळ स्तनाला ओढी, तेव्हा भरती झाले
बाळ प्रकाशा पाही, डोळे माझे दिपले
बाळ हसू लागला, मीही नव्याने हसले
बाळ लागता चालू, पंख मला तर फुटले
बाळ म्हणाले ‘आई’, मी गंगेत बुडाले
हीच भावना इरावती कर्वे यांच्या ‘परिपूर्ती’ लेखात दिसते. ‘मी अमक्याची आई’ हे ऐकल्यावर त्यांना जीवनाची परिपूर्ती झाल्याचे समाधान लाभते.
आमच्या परिचितांची ती नवजात सोनुलीही त्यांच्या जीवनाची परिपूर्ती ठरेल असा विश्वास वाटला.