>> राज्यपाल पिल्लई यांचे धेंपे महाविद्यालयात प्रतिपादन
सुसंस्कारी व्यक्ती घडवणे हे शिक्षणाचे खरे ध्येय असायला हवे. शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळवण्याचे माध्यम नव्हे, असे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी काल सांगितले. धेंपे चॅरिटेबल ट्रस्ट व धेंपे कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वसंतराव धेंपे हीरक महोत्सवी व्याख्यानमालेत काल ते बोलत होते. भारतीय शिक्षण व्यवस्थेचा पुनर्विचार हा त्यांचा व्याख्यानाचा विषय होता.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नवे शैक्षणिक धोरण १८ व त्यावरील वयोगटातील विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून तयार केले आहे. या शैक्षणिक धोरणात देशी भाषा माध्यमांवर भर देण्यात आला असल्याची माहिती यावेळी राज्यपालांनी दिली.
भारतीय शिक्षण व्यवस्थेवर स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी व गुरुदेव रवींद्रनाथ टागोर या तीन थोर विभूतींनी मांडलेल्या विचारांचा प्रभाव असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
मातेच्या पोटात असलेला गर्भही शिकू शकतो असा मतप्रवाह भारतातील महाभारत व अन्य पुरातन खंडकाव्यांतून व्यक्त झालेला आहे, असेही यावेळी राज्यपालांनी सांगितले.
स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी व टागोर यांनी शिक्षणासंबंधी बोलताना तसेच मत व्यक्त केले आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर सुरुवातीच्या काळापासून भारतीय शिक्षण व्यवस्थेवर ब्रिटिश शिक्षण व्यवस्थेचा प्रभाव होता, असेही यावेळी पिल्लई यांनी नमूद केले.
भारताची शैक्षणिक परंपरा ही थोर असून पुरातन काळात भारत हे शिक्षणाचे मुख्य केंद्र होते असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी जुन्या भारतीय विद्यापीठांचा उल्लेखही केला.
आता उच्च शिक्षण देशी भाषांतून देण्याचा जो निर्णय मोदी सरकारने आपल्या नव्या शैक्षणिक धोरणातून घेतलेला आहे तो स्वागतार्ह असल्याचे मत यावेळी राज्यपालांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना धेंपे उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाचे स्वागत केले. धेंपे उद्योग समूहाने राज्यात उभारलेल्या महाविद्यालयांसंबंधी बोलताना त्यांनी, ह्या महाविद्यालयांमुळे गोव्यातील नागरिकांना गोव्यात राहून शिक्षण घेता आले. तत्पूर्वी उच्च शिक्षण घेण्यासाठी गोमंतकीयांना मुंबई व अन्य ठिकाणच्या महाविद्यालयांत जावे लागत असल्याची माहिती दिली.
प्राचार्य वृंदा बोरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केेले. यावेळी प्रशासक राजेश भाटीकर, अन्य अध्यापक उपस्थित होते.