- ज. अ. रेडकर
सांताक्रूज कोणत्या गोष्टीत आपले हित आणि कोणत्या गोष्टीत अहित आहे याची शिकवण मुलांना वेळोवेळी दिली तर भविष्यातील अनेक समस्या निर्माणच होणार नाहीत. चला तर मग, नवीन वर्षाचा असा संकल्प करुया की, ‘मी माझ्या मुलांना चंगळवादापासून दूर ठेवीन व सुसंस्कारी पिढी घडवीन’.
२०२० साल बघता बघता मागे पडले. साधारणपणे पन्नास-साठ वर्षांपूर्वी वर्ष संपता संपत नसे. किती दीर्घ वाटायचा एक वर्षाचा काळ! आज वर्ष सुरू कधी झाले आणि कधी संपले हेच समजेनासे झाले आहे. कारण मानवी जीवन गतिमान झाले आहे. आता नवीन वर्षाला सुरुवात झाली. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री उत्साही तरुणाईने जल्लोष केला. विशेषतः जिथे जिथे सुंदर समुद्र किनारे आहेत तिथे तिथे या उत्साहाला उधाण येते. २०२० हे साल संपूर्ण जगाला महामारी, बेरोजगारी, आर्थिकदृष्ट्या जिकिरीचे गेले. एरवी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जगभर जशी गर्दी उसळते तशी यंदा झाली नाही. सरकारी बंधने आणि कोरोना व त्याचा जुळा भाऊ स्टेन याने जग हबकून गेले आहे. अशा परिस्थितीत उत्साहावर मर्यादा आल्या. तरीदेखील खुशालचेंडू लोकांच्या जल्लोषात कमतरता आली नाही.
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गोव्याचे किनारे आधीच दोन दिवस भरून गेले. गेले आठ-दहा महिने पर्यटनावर कोरोनाचे पडलेले सावट आणि त्याचा छोट्या- मोठ्या व्यवसायावर पडलेला प्रभाव याने व्यापारी, ठेलेवाले, हॉटेलवाले, दुकानदार, वाहतूक व्यावसायिक यांच्या चेहर्यावर जी उदासीनता होती ती काहीशी दूर झाली. वर्ष सरता सरता कोरोनाच्या जुळ्या भावंडाने प्रवेश केल्याच्या बातम्या आल्या आणि पुन्हा लोक काळजीत पडले. नुकतेच कुठे कोरोनासंगे जगण्याची धडपड सुरू होती आणि या नव्या विषाणूचे आगमन झाले. प्रारंभी याचे प्रमाण भयावह नसले तरी त्याच्या प्रसाराचा वेग कोरोनाच्या अधिक पटीचा आहे असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
३१ डिसेंबरची रात्र म्हणजे जुन्या वर्षाची अखेरची रात्र आणि नव्या वर्षाच्या उदयाची असते. परंतु जसजसे दिवस मागे पडतात तसतसे नावीन्य संपत जाते. नव्या नवतीचे नऊ दिवस तसे हे सुरुवातीचे दिवस असतात. नंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या..’ तसे जीवनचक्र सुरू होते. जगण्यासाठी तीच धडपड, तोच व्याप आणि तोच ताप सहन करीत माणसे कालक्रमण करीत राहतात. गेल्या वर्षी जे काही वाट्याला आले ते निदान नव्या वर्षात तरी येऊ नये अशी सर्वांचीच आशा- अपेक्षा असते. परंतु काळाच्या उदरात काय दडलेले असते हे कुणीच सांगू शकत नाही. म्हणूनच जो क्षण आला आहे तो आनंदाने जगण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. कशाला हवेत रुसवे-फुगवे, हेवे-दावे, तंटे-भांडणे आणि जराजराशा कारणाने खून- मारामार्या? जन्माला येताना आपण काही आणले नाही आणि जाताना काही घेऊनदेखील जाणार नाही असा विचार आपण सगळ्यांनी जर केला तर जीवन किती सुरेख आणि आनंदी होईल. नाही का?
सत्ता आणि संपत्तीच्या हव्यासाने आपण धाव धाव धावतो आणि उपभोगाचा क्षण येतो तेव्हा आपण गलितगात्र झालेलो असतो. अगदी टॉलस्टॉयच्या त्या कथेतील हावरट माणसासारखे. मग अशा सत्ता आणि संपत्तीचा उपयोग तरी काय? बरे, आपली मुले-बाळे, भाऊबंद हे तरी आपण मागे ठेवलेल्या संपत्तीचा आणि साम्राज्याचा निर्भेळ उपभोग घेऊ शकतील? तसेही नाही. मुले हव्यासापायी एकमेकांचे गळे घोटतील, भावा- भावात वितुष्ट येईल, एकमेकांना संपविण्यासाठी कटकारस्थाने करतील, कोर्ट कचेर्या करतील आणि हे जरी झाले नाही तरी श्रमाविना मिळालेल्या संपत्तीचा आणि सत्तेचा दुरुपयोग केला जाईल. शेवटी विनाश हा ठरलेलाच! म्हणूनच जगण्यापुरते मिळवावे, पुढच्या पिढीला स्वतःच्या पायावर उभे करावे, करू द्या त्यांना श्रम, कळू द्या त्यांना पैशाची किंमत! असे केले तरच वारेमाप चाललेली उधळपट्टी थांबेल, चंगळवाद आटोक्यात येईल. व्यसनाकडे चाललेली तरुणाई यातून काही नक्कीच शिकू शकेल.
आज आपण काय पाहतो? तर आपण पैशाअभावी बालपणी जे उपभोगू शकलो नाही ते मुलांना उपभोगू द्यावे, ती धरतील तो हट्ट आपण पुरा करावा, असा विचार पालक करीत असतात. नेहमी शेजारच्या घरात काय आहे, शेजारच्या किंवा शिकत असलेल्या वर्गातील मुलाकडे काय आहे याची तुलना करून आपण त्यांच्यापेक्षा वरचढ कसे ठरू यासाठी सतत धडपड चालू असते. यातून मुलांना आपण वेगळ्या दिशेने नेत असतो हे आपण विसरतो. तुम्ही नव्याण्णव गोष्टी मुलांना आणून द्या आणि एखादी गोष्ट देऊ शकला नाहीत तर पहा काय होते. तुम्ही त्यांचे शत्रू बनता. आता तर अगदी छोट्या छोट्या कारणासाठी मुले आत्महत्या तरी करतात किंवा पालकांचा खून तरी! हा सगळा अति लाडाचा परिणाम असतो.
आपण मुलांना किती अपूर्वाईने आणि कौतुकाने वाढवतो परंतु एकदा मुले मोठी झाली, नोकरी व्यवसायात गुंतली की स्वकमाईचा त्यांना गर्व होतो. आई-वडिलांनी आपल्यासाठी काढलेल्या खस्ता ती विसरतात. लग्न झाल्यावर तर ही मुले बायकोच्या अधीन होतात आणि प्रसंगी आपल्या आई-वडिलांचा अवमान आणि अपमान करतात. शोकांतिका म्हणजे आई-वडिलांना हे सगळे मुकाट्याने सहन करावे लागते. कुठे बोलायचीदेखील सोय नसते. कारण समजा आपली वेदना कुणापुढे उघड केली तर आपली आपणच पत गमावून बसू अशी भीती असते.
म्हणूनच लहानपणापासून मुलांच्या अवास्तव मागण्या पूर्ण करण्याऐवजी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि त्याचे परिणाम काय होतील याची शिकवण त्यांना द्यायला हवी. पैसा मिळवणे किती कठीण असते, तो मिळविण्यासाठी किती कष्ट करावे लागतात, किती तडजोडी कराव्या लागतात, हे मुलांना कळवून द्यायला हवे. कोणत्या गोष्टीत आपले हित आणि कोणत्या गोष्टीत अहित आहे याची शिकवण मुलांना वेळोवेळी दिली तर भविष्यातील अनेक समस्या निर्माणच होणार नाहीत.
चला तर मग, नवीन वर्षाचा असा संकल्प करुया की, ‘मी माझ्या मुलांना चंगळवादापासून दूर ठेवीन व सुसंस्कारी पिढी घडवीन’.