सुशिक्षितच नव्हे; सुसंस्कृतही व्हा!

0
25
  • रमेश सावईकर

माणूस म्हणून मानवतेला जन्मभर आपला प्रकृतिधर्म मानून जो सत्कार्य करतो तोच खऱ्या अर्थाने जीवन जगतो नि त्याचं जीवन त्याच्यासाठी नि समाजासाठी महत्त्वपूर्ण, अर्थपूर्ण नि अमूल्य ठरतं. असा योग जीवनात घडून येण्यासाठी माणूस घडावा लागतो. त्याची जडण-घडण योग्य प्रकारे व्हावी लागते.

माणसाचं जीवन फार मोलाचं आहे. जीवन हे अर्थशून्य आहे असं म्हटलं जातं. पण जो माणूस या शून्यातून अर्थ काढतो त्याचं जीवन अर्थपूर्ण बनतं, सत्कारणी लागतं. म्हणून माणसाने जीवनात चांगले विचार, चांगले आचार नि चांगली कर्मे यांची कास धरून जीवन जगलं पाहिजे. परमेश्वराने आपणाला माणसाचा जन्म दिलाय. त्या जन्मावर नि जगण्यावर माणसाने शतदा प्रेम करायला हवे. माणसाचा जन्म प्राप्त झाला नि आयुष्य जगला म्हणजे जीवनात आपले कल्याण झाले, जीवन सार्थकी लागले असे होत नाही. माणूस म्हणून मानवतेला जन्मभर आपला प्रकृतिधर्म मानून जो सत्कार्य करतो तोच खऱ्या अर्थाने जीवन जगतो नि त्याचं जीवन त्याच्यासाठी नि समाजासाठी महत्त्वपूर्ण, अर्थपूर्ण नि अमूल्य ठरतं. असा योग जीवनात घडून येण्यासाठी माणूस घडावा लागतो. त्याची जडण-घडण योग्य प्रकारे व्हावी लागते. ही फार मोठी जबाबदारी बालपणात आपले आईवडील, शालेय जीवनात शिक्षक, युवा जीवनात गुरू निभावत असतात. शिक्षक आपल्याला सन्मार्गावर आणून ‘गुरू’शी सोडतो नि गुरू जीवन सार्थकी लावण्यासाठी मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवतो. माणसाचा जीवनातील हा प्रवास त्याच्यावर वेगवेगळ्या टप्प्यांत संस्कार करतो. त्या संस्कारांतून खऱ्या अर्थाने ‘माणूस’ घडतो, ‘माणूस’ बनतो.
माणसाच्या जीवनात शिक्षणाला फार महत्त्व आहे. शिक्षणातून ज्ञानप्राप्ती होते. शाळांतून मिळणारे शिक्षण माणसाला विविध विषयांची माहिती, ज्ञान देते. ते ज्ञान प्राप्त झाल्यावर आपण सुशिक्षित बनतो. जे विद्यार्थी उच्चशिक्षण घेतात ते विद्याविभूषित होतात. पण या ज्ञानाला जर उत्तम संस्कारांची जोड लाभली नाही तर ते ज्ञान सज्ञान ठरणार नाही.

माणसाचं जीवन यशस्वी होण्यासाठी त्याला जीवनाची मूल्ये समजली पाहिजेत. त्या मूल्यांचं नुसतंं ज्ञान देऊन भागत नाही, ती मूल्ये विद्यार्थी-अवस्थेत त्यांच्या मनात बिंबवावी लागतात. विद्यार्थी-अवस्थेत आकलनशक्ती तीव्र व तीक्ष्ण असते. विद्यार्थिदशेत तो कोणतं ज्ञान, कोणत्या गोष्टी आकलन करतो त्यावरती त्याची जडण-घडण होते. म्हणून बालपणापासूनच पालकांकडून जीवनविषयक चांगले संस्कार घडायला हवेत. बालपणात बालक त्याला जे दिसतं, आवडतं, त्याचे अनुकरण करतो. म्हणून बाल्यावस्थेत बालकाला चांगल्या वस्तू, चांगलं वागणं यांचं दर्शन घडवणं ही आई-वडिलांची जबाबदारी असते. ‘अनुकरण’ अवस्थेतून बालक पुढे जात असतो. त्यानंतर बालकाला चांगले काय, वाईट काय याचे ज्ञान करून देणे गरजेचे असते. विद्यार्थी-अवस्था ही संस्कारक्षम असते. आपलं मूल चुकीच्या गोष्टी करीत असेल तर त्याला त्यापासून दूर ठेवणे, चांगल्या प्रकारे बोलणे, वागणे, शिकवणे हे आईवडिलांचे कर्तव्य असते. ते किती चोखपणे बजावतात त्यावरती संस्काराचा विद्यार्थिमनावर होणारा परिणाम व प्रभाव अवलंबून असतो.

आपणाला शिक्षक जे शिकवतात ते खरे आहे, जे बोलतात-सांगतात तेच सत्य आहे असा विद्यार्थ्यांचा शिक्षकावर विश्वास असतो. तशी दृढ श्रद्धा असते. एकवेळ आई-बापानं सांगितलं तर पटणार नाही, ऐकून घेणार नाही; पण शिक्षकाने सांगितलं तर त्यांच्याविषयी असलेला विश्वास-आदर यामुळे विद्यार्थी (मुलं) शिक्षकांच्या आज्ञेचं पालन करतात. सर्वात महत्त्वपूर्ण असा संस्कारक्षम अवस्थेचा विद्यार्थी-दशेतला तो काळ असतो. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळांतून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना फक्त विविध विषयांची माहितीयुक्त ज्ञान, शिक्षण म्हणून देऊन भागणार नाही. त्या शिक्षणाला जीवनमूल्यांच्या शिक्षणाची जोड हवी. जीवनाची जी सर्वात महत्त्वाची मूल्ये आहेत ती म्हणजे- सत्य, प्रामाणिकपणा, निस्वार्थीपणा, निरागसता, त्याग, परोपकार आणि माणुसकी. विद्यार्थ्यांमध्ये हे गुण अंगिभूत व्हावे म्हणून शिक्षकवर्गाने अथक प्रयत्न करणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण हे मूल्याधिष्ठित हवे.

माणसाचं युवाजीवन हे फार महत्त्वाचं असतं. ज्याला इंग्रजीत आपण ‘टीन एज’ म्हणतो. तो कालखंड म्हणजे तेरा ते एकोणीस असा सात वर्षांचा असतो. तेरा-चौदा वर्षात तर त्याची अवस्था वेगळीच असते. तो आपणाला एखाद्या गोष्टीचं ज्ञान आहे म्हणून मोठ्या माणसासारखा बोलला तर त्याला ‘बालकासारखा’ म्हणून संबोधलं जातं अन्‌‍ आपणाला कळत नाही असं समजून बोलला तर ‘बालिश’ म्हटलं जातं. ‘टीन एज’मध्ये युवक/युवती मानसिक ताणतणावाच्या अवस्थेतून जात असतात. त्यांचे जीवन म्हणजे वादळात सापडलेल्या, भरकटत जाणाऱ्या होडीसारखे. त्यावेळी त्यांची मनोवस्था पालकांनी समजून घेऊन त्यांना फार जपायला हवे. तसेच शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या मनोवस्थेची जाणीव ठेवून शाब्दिक घावांतून त्यांची मने दुखावली जाणार नाहीत याची खबरदारी घ्यायला हवी. त्या काळात शिक्षकांनी समुपदेशकाची भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना सन्मार्गाने पुढे नेले पाहिजे.
महाविद्यालयीन जीवन हे तर फुलपाखरासारखे असते. या फुलावरून त्या फुलावर स्वैर विहार करणारे. प्राध्यापक मंडळी विद्यार्थ्यांच्या वागण्याआड, इच्छेआड येऊ शकत नाही. या काळात आपणाला कोणता- कसला मित्रवर्ग भेटतो त्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. चांगले संस्कार झालेले मित्र-मैत्रिणी भेटल्या तर आपण सन्मार्गक्रमण करू शकतो; अन्यथा स्वैर मार्गाने पुढे गेल्यास चुकीच्या मार्गाला लागू शकतो. या वयोवस्थेतही ज्ञानप्राप्ती करीत असताना संस्कार महत्त्वाचे ठरतात.
पदवी, उच्च पदवी प्राप्त केल्यानंतर मग ती कोणत्याही तांत्रिक, वैद्यकीय, कायदा, वाणिज्य-व्यापार, जनसंपर्क वा अन्य कोणत्याही शाखेची असो, आपण नोकरी-व्यवसाय करतो. सामाजिक जीवनात आपला तो खऱ्या अर्थाने प्रवेश असतो.

सामाजिक जीवनात माणूस सक्रिय बनतो- मग तो नोकरी करण्याच्या निमित्ताने असो किंवा व्यवसायाच्या निमित्ताने असो, त्याला शिक्षणयुक्त ज्ञानाशिवाय आपण जीवनात बरेच काही शिकलो नाही याची प्रचिती देणारे अनुभव येतात. ‘जे शिकलो नाही’ असं त्याला वाटतं ते योग्य अशा संस्कारांअभावी. समाजात वावरताना विभिन्न स्वभावाची, प्रकृती-धर्माची, ज्ञानी, अज्ञानी माणसं आपणाला भेटतात. त्यांच्याशी संपर्क येतो. त्यावेळी एखादं ‘प्रमेय’ वापरून काम निभावत नाही, तर माणूस ओळखून, त्याची पारख होऊन त्याच्याशी वागावं लागतं तरच आपला निभाव लागतो. या अनुभवातून आपण एवढं ज्ञान मिळवलं, ज्ञानानं परिपूर्ण झालो असा करून घेतलेला समज म्हणजे निव्वळ भ्रम होता हे कळून चुकतं.

यातून काय शिकायला मिळतं? तर ज्ञान हे अथांग आहे. ते कितीही संपादन केले तरी अपूर्णच! उच्चतम पातळी गाठली (एखाद्या क्षेत्रात) तरीदेखील आपला आत्ताच कुठं पूर्णतेच्या परिघात प्रवेश झाला (केला), एवढंच म्हणू शकतो. माणूस हा अखेरपर्यंत शिकत असतो. कारण शिकणं ही सतत घडणारी चालू प्रक्रिया आहे. म्हणून कितीही शिकलो तरी शिक्षण संपत नाही. शिकण्यासारखं खूप राहिलेलं असतं याची जाणीव ठेवून माणसानं दैनंदिन शिकत राहावं- आपणाला येणाऱ्या अनुभवांतून, परानुभवांतून, अवती-भवती घडणाऱ्या घटनांतून…!
सामाजिक जीवनात वावरताना व्यवहारापेक्षा जीवनमूल्याला महत्त्व देऊन अर्थप्राप्ती केली, संसार केला तर त्यातून मिळणारे यश हे टिकणारे असते. ते तकलादू नसते. म्हणून जीवनमूल्यांशी तडजोड करू नका. प्रामाणिकपणा जपा. सत्य, परोपकार, मानवता या गुणांना प्राधान्य देऊन जीवन जगा असा संदेश तज्ज्ञ-ज्ञानी विभूती दीक्षांत समारोह सोहळ्यात पदवीधारकांना देतात. तो संदेश शिक्षण संपादणाऱ्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे. संतांनीसुद्धा धनप्राप्तीबद्दल ‘धन जोडोनिया, उत्तम व्यवहारे’ असे म्हटले आहे. संतांचे हे विचार म्हणजे जीवनातील साक्षात्कारच! म्हणून त्याचे आचरण केल्यास यशप्राप्ती खचितच होईल!