सुशासनासाठी अधिकाऱ्यांचे सहकार्य आवश्यक

0
14

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन; पर्वरीत सुशासन दिन साजरा

राज्यातील सर्व अधिकाऱ्यांनी सुशासनासाठी कंबर कसली पाहिजे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या कार्यकाळात सुरू केलेले परिवर्तन आणि सुशासन हे कार्य आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुढे नेत आहे. राज्य सरकार सुध्दा सुशासनाला प्राधान्यक्रम देत आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केले.

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पर्वरीत आयोजित सुशासन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
माजी पंतप्रधान वाजपेयी यांची जयंती सुशासन दिन म्हणून देशभर साजरी केली जाते. यानिमित्त पर्वरी येथे सचिवालयात आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या समवेत केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची उपस्थिती होती.

वाजपेयी यांनी सुशासनासाठी सरकारी पातळीवर अनेक सुधारणा घडवून आणल्या होता. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत आहेत. राममंदिर निर्मिती, काश्मीरमधील 370 कलम हटवणे, अंत्योदय या तत्त्वांवर केंद्र सरकारची वाटचाल सुरू आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.