सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या सात सदस्यीय वैद्यकीय पथकाने एकमुखाने दिलेल्या अहवालामध्ये त्याचा मृत्यू हा हत्या नसून आत्महत्याच असल्याचा निर्वाळा दिलेला आहे, त्यामुळे आता त्याबाबत संशय निर्माण केला जाऊ नये असे या पथकाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी म्हटले आहे. सुशांतच्या शवचिकित्सा तसेच व्हिसेरा अहवालाच्या परिशीलनानंतर पथकाने मृत्यू आत्महत्येमुळेच ओढवला असल्याचा निष्कर्ष काढला असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. गुप्ता यांच्या आधीच्या वक्तव्यात त्यांनी सुशांतसिंहचा मृत्यू ही हत्या असावी असा संशय व्यक्त केल्याने ते व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त झाल्याने गुप्ता यांनी हे स्पष्टीकरण दिले.