>> अवैध सावकारीसंदर्भात आज मुंबईत जबानी
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपुत आत्महत्या प्रकरणात अंंमलबजावणी संचालनालयाने काल गोव्यातील एका हॉटेल व्यावसायिकास अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा २००२ खाली येत्या ३१ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता मुंबईतील बॅलार्ड इस्टेट कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. अवैध सावकारी (मनी लॉंडरिंग) संदर्भात ही चौकशी करण्यात येत आहे.
हणजूण येथे हॉटेल चालविणार्या या परप्रांतीय व्यावसायिकाचा सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याशी संपर्क होता हे तिच्या व्हॉटस् ऍप चॅटवरून स्पष्ट झाले असून कथित अमली पदार्थ पुरवठ्यासंदर्भातही त्याची चौकशी होणार आहे.
सदर हॉटेल व्यावसायिकाच्या गोव्यातील हॉटेलबाहेर त्याला ३१ रोजी चौकशीसाठी पाचारण करण्यात येत असल्याची नोटीस लावण्यात आली आहे. त्याला हे समन्स जारी करण्यासाठी गोव्यात दाखल झालेल्या अधिकार्यांना तो न भेटल्याने त्याच्या मालमत्तेवर ही नोटीस लावण्यात आली आहे.
रिया चक्रवर्ती हिने २०१७ साली या हॉटेल व्यावसायिकास व्हॉटस् ऍपवर काही संदेश पाठवले होते. त्यात काही अमली पदार्थांच्या पुरवठ्याबाबत उल्लेख आढळून आले आहेत.
दरम्यान, सदर हॉटेल व्यावसायिकाने आपल्यावरील आरोपांचा इन्कार केला असून आपला रियाशी तीन वर्षांपूर्वी संपर्क झाला होता. आपला कोणत्याही अमलीपदार्थ व्यवहाराशी हात नसून सर्व कायदेशीर बाबींना आपण सामोरे जाऊ अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. रियाने व्हॉटस् ऍपवरून ज्यांच्याकडे अंमली पदार्थ मागितले होते, किंवा व्यावसायिक बोलणी केली होती, अशा इतर काही जणांनाही समन्स जारी करण्यात येणार आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने अमली पदार्थविरोधी विभागाला (एनसीबी) या प्रकरणातील अमली पदार्थविषयक अंगाची कल्पना दिली असून एनसीबीतर्फे स्वतंत्र तपास केला जात आहे. एनसीबीचे तीन सदस्यीय पथक गुरुवारी दिल्लीहून मुंबईला पोहोचले असून अमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्यांसमवेत बैठक घेऊन त्यांनी चर्चा केली.
रिया चक्रवर्तीची सीबीआयकडून जबानी
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाकडून रिया चक्रवर्ती हिची काल पहिल्यांदाच जबानी घेण्यात आली. कालिना – सांताक्रुझ येथील डीआरडीओच्या अतिथीगृहामध्ये सीबीआय अधिकार्यांनी तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तत्पूर्वी सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा यांचीही पुन्हा जबानी नोंदवण्यात आली. सीबीआयचे पथक गेला आठवडाभर तपासासाठी मुंबईत ठाण मांडून आहे. गुरुवारी त्यांनी रियाचा भाऊ शौविक याची जबानी नोंदवली होती. सिद्धार्थ पिठानी, सुशांतचा स्वयंपाकी नीरज सिंग, मदतनीस दीपेश सावंत आदींची जबानी आजवर नोंदवण्यात आली आहे.