सुवर्णप्राशन आणि मुलांचे आरोग्य

0
376
  • वैद्य स्वाती अणवेकर
    (म्हापसा)

सुवर्णप्राशनाच्या नियमित सेवनाने मुलांची शारीरिक व बौद्धिक वाढ चांगली होते. तसेच त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे ती वारंवार आजारी पडत नाही. यात औषधीसिद्ध देशी गाईचे तूप असते. मध असतो. व सुवर्णभस्म असते.

बर्‍याच पालकांनी मागणी केली की आम्ही आमच्या मुलांना नियमित व पूर्ण विश्‍वासाने दर महिन्याला सुवर्णप्राशन पाजतो. पण ह्यामध्ये नेमकं काय असतं आणि मुलांना ह्याचा काय फायदा होतो ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ह्या लेखामध्ये आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
सुवर्णप्राशनाचा उल्लेख आयुर्वेदाच्या काश्यपसंहितेत केलेला आहे. या सुवर्णप्राशनामध्ये नेमके कोणते घटक असतात ते प्रथम पाहू या…
यात औषधीसिद्ध देशी गाईचे तूप असते. मध असतो. व सुवर्णभस्म असते. असे हे मिश्रण महिन्यातून एकदा येणार्‍या पुष्य नक्षत्राच्या दिवशी मुलांना पाजले जाते. कारण पुष्य नक्षत्रात सुवर्णयुक्त औषधांचा शरीरावर चांगला परिणाम होताना दिसून येतो.
हे सुवर्णप्राशन सर्वसाधारणपणे नवजात बालकापासून ते १०व्या वर्षापर्यंतच्या बालकांना पाजावे लागते. काही वैद्य हे १२ किंवा १४व्या वर्षापर्यंतसुद्धा देतात. तसेच सुवर्णप्राशन पाजताना पालकांनी ध्यानात ठेवावे की बालकाला सुवर्णप्राशन देण्याच्या एक तास आधी आणि दिल्याच्या एक तासनंतर काहीही खायला देऊ नये. असे केल्याने औषधाचे कार्य शरीरामध्ये उत्तम प्रकारे होते.
तसेच हे औषध मुलांना ताप, उलटी, जुलाब इ. तक्रारी असल्यास देऊ नये.

कोणकोणत्या औषधी वापरल्या जातात –
सुवर्णप्राशनामध्ये ब्राह्मी, शंखपुष्पी, वचा, गुळवेल, ज्येष्ठमध, अश्‍वगंधा, शतावरी इत्यादी औषधे वापरली जातात.
१. यामध्ये वापरली जाणारी ब्राह्मी ही मेंदूचे पोषण करते. बुद्धी तल्लख करायला मदत करते.
२. शंखपुष्पी – ही ओजवृद्धी करते. मेंदूला बळ देते. मानस व्याधी शमन करते. शरीरातील धातूंचे पोषण करते.
३. वचा/वेखंड – ही ज्ञानग्रहण सामर्थ्य व स्मृती वाढवते. ती बुद्धीवर्धक असून वाणी सुधारायला उपयोगी ठरते.
४. गुडूची/गुळवेल – हे रसायन कार्य करते व शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते. तसेच शरीरातील सातही धातूंवर कार्य करते व शरीराचे आरोग्य सुधारते.
५. ज्येष्ठमध – याने शरीरामधील धातूंची पुष्टी होते. प्रामुख्याने मांसधातूची पुष्टी होते. स्वर सुधारणे, तसेच ओजवृद्धी होते.
६. अश्‍वगंधा – ही बलकारक असून रसायन कार्य करते. तसेच धातूंचे पोषण उत्तम प्रकारे करते.
७. शतावरी – ही धातूचे पोषण करून मेध्य कार्य करते ज्याने शरीराची शक्ती व मांस धातूची चांगली वाढ होते. तसेच रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढते.
८. सुवर्णभस्म – यात वापरले जाणारे सुवर्णभस्म हे बुद्धीची वाढ योग्यरीत्या करण्यास उपयुक्त ठरते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवते. तसेच ते उत्तम रसायन म्हणून कार्य करते.
९. गोघृत – गाईचे तूप हे बुद्धीवर्धक आहे. शरीराची पुष्टी करते. तसेच मैंदूवर कार्य करणारी औषधे गोघृतासोबत वापरल्याने त्या औषधांची कार्यक्षमता वाढते.
१०. मध – यामध्ये वापरले जाणारे मध हे औषधाला चांगली गोडसर चव तर देतेच शिवाय ते योगवाही असल्याने यामध्ये वापरल्या जाणार्‍या सर्व औषधांचे गुणधर्म वाढवण्यासही मदत करते.
थोडक्यात सांगायचे झाल्यास सुवर्णप्राशनाच्या नियमित सेवनाने मुलांची शारीरिक व बौद्धिक वाढ चांगली होते. तसेच त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे ती वारंवार आजारी पडत नाही व जरी पडले तरी आजाराच्या वाढीमध्ये अडथळा ठरते.

मी स्वतः एका विशेष शाळेमधील मुलांना गेली ५-६ वर्षे सुवर्णप्राशन देत आहे व त्या विशेष मुलांमध्ये… जी मुले सुवर्णप्राशन नियमित घेतात… त्यांच्यामध्ये बराच फरक दिसून आला आहे. उदा. काही मुले जी मुळीच क्रियाशील (ऍक्टिव्ह) नव्हती ती काही प्रमाणात क्रियाशील झाली. जी मुले जास्त क्रियाशील (हायपरऍक्टिव्ह) होती ती शांत झाली. काही मुले अजिबात बोलत नव्हती ती बोलण्याचा प्रयत्न करु लागली. ज्या मुलांची आकलनशक्ती अगदीच नगण्य होती, त्यांच्या आकलनशक्तीमध्ये वाढ झालेली दिसून आली आहे.

त्यामुळे सुवर्णप्राशन नियमितपणे मुलांना दिल्यास त्याचा फायदा मुलांच्या एकंदरित आरोग्यावर काही कालांतराने आपल्याला नक्की दिसतो. हे सुवर्णप्राशन दर महिन्याला एकदा देऊन काही वैद्य मुलांना नियमितपणे देण्यासाठी भेद्य औषधांची, पूर्ण किक् सुवर्णकिक् ड्रॉप्स देतात आणि त्याचादेखील मुलांना चांगला उपयोग होतो.

त्यामुळे आपण आपल्या मुलांचे भावी आयुष्य सुकर व्हावे यासाठी जशी आर्थिक तरतूद करून ठेवतो तसेच त्यांच्या चांगल्या आरोग्य व बौद्धिक विकासासाठी आपण सर्व पालकांनी सुवर्णप्राशन संस्कारामध्ये नियमित गुंतवणूक करावी ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे.