साखळी मतदारसंघातील सुर्ल पंचायतीचे माजी पंचसदस्य प्रशांत रघुनाथ नाईक गावकर (59, रा. गावकरवाडा सुर्ल) यांचा काल दुपारी घडलेल्या स्वयंअपघातात मृत्यू झाला. सुर्ल येथील दुग्ध सोसायटीजवळच रस्त्यावर म्हशी आडव्या आल्याने त्यांच्या दुचाकीला अपघात घडला. गावकर हे आपल्या दुचाकी (क्र. जीए-05-एन-1383) वरून जात असताना रस्त्यावर अचानक म्हशी आडव्या आल्या. त्यांना जोरदार धडक दिल्याने ते दुचाकीसह रस्त्यावर पडले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना इस्पितळात नेण्यात आले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. डिचोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्रशांत नाईक गावकर हे विद्यमान पंच सदस्या सुचिता गावकर यांचे पती होत. सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत.