सुरेंद्र फुर्तादोंची उमेदवारी दाखल

0
94
उमेदवारी अर्ज सादर करताना कॉंग्रेसचे उमेदवार सुरेंद्र फुर्तादो. सोबत चेल्लाकुमार, प्रतापसिंह राणे व लुईझिन फालेरो.

पणजी पोटनिवडणूक
दि. १३ फेब्रुवारी रोजी होणार्‍या पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेस उमेदवार म्हणून पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी काल दुपारी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्या बरोबर प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो व विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.गेल्या २० वर्षांत पणजी मतदारसंघाचा विकास झाला नाही. महापालिकेच्या आपल्या प्रभागांमध्ये ज्याप्रमाणे आपण विकास केला त्याच धर्तीवर आपण संपूर्ण पणजी मतदारसंघाचा विकास करून कायापालट करणार असल्याचे फुर्तादो यांनी अर्ज सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पक्षाच्या प्रत्येक आमदारावर मतदान केंद्राची जबाबदारी देण्यास आपण विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांना सांगितले असून त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत कॉंग्रेस उमेदवार फुर्तादो विजयी होतील यात संशय नाही. फुर्तादो यांना नगरसेवक व महापौर म्हणून मतदारसंघात काय हवे नको याची माहिती आहे, असे फालेरो यांनी सांगितले. पणजी हे अत्यंत सुंदर शहर होते. आता कचर्‍याचे ढीग झाले आहेत. प्रदूषणामुळे नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. कॅसिनोमुळे मांडवी नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केलेली नाही. याचा विचार करून या शहराला गतवैभव प्राप्त करून देण्याचे काम फुर्तादो पूर्ण करतील, असे फालेरो यांनी सांगितले.