शेतकर्यांना ‘सुरय’ तांदूळ उत्पादनाची सुविधा मिळणार
राष्ट्रीय कृषी विकास योजनेखाली धारगळ येथे खाजगी तत्वावर गोवा कोल्ड स्टोरेज या कंपनीला सुरय तांदळांसाठी गिरण घालण्यास मान्यता दिली असून या प्रकल्पाचे कामही चालू असल्याची माहिती कृषी संचालक अर्नाल्ड रॉड्रिगिस यांनी दिली.वरील गिरण तयार झाल्यानंतर सुरय तांदळांसाठी वापरण्यात येणार्या भाताच्या बियाण्यांचा गोव्यात उपयोग करणे शेतकर्यांना शक्य होईल. बाजारपेठेत सुरय तांदळांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु गिरण सुविधा नसल्याने शेतकरी या जातीच्या भाताची लागवड करण्यास राजी नव्हते. यापूर्वी राष्ट्रीय विकास योजनेखाली सहकारी तत्वावर गिरण प्रकल्प उभारणार्यांनाच अनुदान योजनेचा लाभ देण्याची तरतूद होती. गोव्यात वरील प्रकल्प उभारण्यासाठी कोणतीही सोसायटी पुढे आली नाही. खाजगी तत्वावर हा प्रकल्प उभारण्यासाठी काहीजण तयार होते. त्यामुळे सरकारने आता वरील योजनेचा लाभ गिरण उभारण्यास तयार असलेल्यांना मिळवून देण्याची तरतूद केली आहे. सुरय तांदूळ तयार करणारी गिरण गोव्यात असावी, अशी येथील शेतकर्यांची इच्छा होती. धारगळ येथील प्रकल्प पुढील तीन महिन्यात तयार होणे शक्य आहे. त्यानंतर शेतकर्यांना सुरय तांदूळ तयार करण्याची सुविधा उपलब्ध होईल, असे कृषी संचालकांनी सांगितले. सुरय तांदळासाठी आवश्यक ते बियाणे उपलब्ध करून देण्याची खात्याची तयारी आहे, असेही त्यांनी सांगितले.