>> साहित्यिक उषा परब यांचे प्रतिपादन : गोवा मराठी अकादमीतर्फे स्त्रीसंगम महिला मराठी संमेलन
संघटन कौशल्य, नेतृत्त्व, दूरदर्शीपणा यात स्त्रीशक्ती विकसित होत आहे. शतकानुशतकाची बंधने झुगारून आजची स्त्री अन्यायाविरूद्ध आवाज उठवू लागली आहे. तरी स्त्रियांना अच्छे दिन का येत नाहीत? आजही स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. स्त्रियांकडे बघण्याची मानसिकता बदललेली का दिसत नाही? असा प्रश्न करून प्रसिद्ध साहित्यिक उषा परब यांनी आपल्या वागण्या, बोलण्यातून वेगळा संदेश जातो का याविषयी आत्मपरीक्षण करावे. जादा जबाबदार्या सांभाळून ‘सुपर वूमन’ होण्याचा अट्टाहास धरू नये, असे आवाहन येथे केले.
गोवा मराठी अकादमीने संस्कृती भवन मधील बहुद्देशीय सभागृहात रविवारी आयोजित केलेल्या स्त्रीसंगम महिला मराठी संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून उषा परब बोलत होत्या. त्यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष सुलक्षणा सावंत, कार्याध्यक्ष शुभदा सावईकर, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनील सामंत, उपाध्यक्ष पुष्पाग्रज (अशोक नाईक), संयोजक सागर जावडेकर व पौर्णिमा केरकर उपस्थित होत्या.
उषा परब म्हणाल्या, स्त्रियांचे आज कौतुक होत असतानाच काय करायला हवे, काय बिनसतंय याचाही विचार करायला हवा. शिक्षणात घेतलेली झेप, वेगवेगळ्या ज्ञान शाखेतील कौशल्य, तक्रार न करता कर्तव्यनिष्ठेने अनेक जबाबदार्या सांभाळणार्या या सर्वांचे कौतुक आहेच. परंतु आपल्या वागण्या, बोलण्यातून वेगळा संदेश जाता कामा नये. धार्मिक परंपरा, अंध:श्रद्धा आपल्या मुळाशी कशा आल्या आहेत, हे स्पष्ट करून परब यांनी सांगितले, की हेवेदावे, कटकारस्थाने, निंदानालस्ती करण्यात बायका पुढे असतात हा समज झालेला आहे किंवा आपण करून दिलेला आहे याचा विचार करायला हवा. आपण गृहीत धरलो जातो का, हाही प्रश्न आहे. आजच्या स्त्रीने काहीही दोष नसताना आगीत उडी मारू नये. अशी संमेलने आत्मपरीक्षण करायला लावण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असतात.
सुलक्षणा सावंत यांनी स्वागताध्यक्ष या नात्याने विठ्ठलालाही संसारात रखुमाईची गरज लागली होती व पुरातन काळापासून स्त्रीची महती कुठेच कमी नाही हे स्पष्ट करून त्या म्हणाल्या, आपण महिला दिनी भेटतो, स्त्री किती सोशिक आहे, तिचे सबलीकरण, तिच्या समस्यांवर बोलतो. परंतु स्त्री पुढे यायला हवी तर तिने स्वत:च प्रयत्न करायला हवेत. स्त्रियांनी कधीच न्यूनगंड बाळगता कामा नये. स्त्री शिक्षित झाली पण तिने व्यक्त होण्याची गरज आहे. स्वामी विवेकानंदानी सांगितले होते स्त्रिला कुठल्याही आधाराची गरज नाही तिला आधी शिक्षित करा, याचे त्यांनी स्मरण करून दिले व सावित्री फुलेंनी स्त्री शिक्षणासाठी क्रांती केली म्हणूनच आज आम्ही इथे आहोत याची जाणीव दिली. त्यांनी स्वप्न कुठे बघावे, कमतरतेला शक्तीत परिवर्तीत जीवनात समतोल ठेवा, स्वत:च्या आवडीची गोष्ट करा, स्वत:वर विश्वास ठेवा, शेवटपर्यंत गोष्टीचा पाठपुरावा करा, न्युनगंड दूर सारा ही सात सूत्रे सांगितली.कार्याध्यक्ष सावईकर यांनी गोमंतकीय महिलांच्या विविध क्षेत्रातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्या म्हणाल्या, प्रत्येकाच्या आत एक फुलणारे फूल असते. फुलण्यासाठी त्याला एक मोकळं आभाळ हवं असतं. या संमेलनाच्या निमित्ताने आपल्यातील फुल फुलविण्यासाठी एक मोकळे आभाळ तुमच्यासमोर आहे. प्राचार्य सामंत म्हणाले, अशा संमेलनातून महिलांना कलात्मक गुणांचे नक्षत्रांचे देणे लाभले आहे. त्याचा शोध लागतो व या व्यासपीठावर मग रूजणं, फुलणं होतं. गोवा मराठी अकादमीतर्फे महिलांना यापुढे साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात पुढे येण्यासाठी उत्तरोत्तर व्यासपीठ दिले जाईल.
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत पदके मिळविण्यापर्यंत मारलेली मजल याबद्दल सांगितले. चित्रा क्षीरसागर यांनी एमएबीएड करूनही नोकरी न मिळाल्याने जिद्दीने केलेली वाटचाल, स्वयंसाहाय्य गट स्थापन करून साडे चारशे महिलांना मिळवून दिलेला रोजगार, संघर्षातून वाट काढीत मिळविलेले यश हा प्रेरणादायी प्रवास कथन केला. त्या म्हणाल्या, महिलांना आर्थिक सक्षमीकरण महत्त्वाचे आहे. महिलांनी स्वत:शीच स्पर्धा करायला हवी.
लीना म्हणाल्या, मी अपघाताने पत्रकारितेत आली, मला गाण्याची, अभिनयाची आवड होती. त्यासाठी वडिलांचा पाठिंबा होता. मात्र आईचा विरोध. श्री साप्ताहिकात अरूण ताम्हणकर यांनी संधी दिली. त्यानंतर सिने पत्रकारिताही केली. डॉ. म्हांबरे यांनी अध्यापन क्षेत्रात आल्यामुळे मनन, चिंतन झाले असे स्पष्ट करून एमफील करतानाचे अनुभव सांगितले.
सकाळच्या शेवटच्या सत्रात महिला मंडळ मडगावच्या महिलांनी लोकगीते, प्रेमगीते यावर घडविलेला नृत्यविष्कार ‘वेलकम टू जीएमसी’ ही विनोदी नाटिका सादर केली. त्याचे सादरीकरण सर्वांनाच आनंद देऊन गेले व महिला संमेलनाची लज्जत वाढवून गेले. रंजिता पै यांच्या नेतृत्वाखाली सादर झालेल्या या कार्यक्रमात ४५ महिलांचा समावेश होता. विनया शिंक्रे यांनी निवेदन केले.
कवी संमेलन रंगले
शेवटच्या सत्रात उषा परब यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन रंगले. त्यात नलिनी देशपांडे, दया मित्रगोत्री, अंजली आमोणकर, नीता तोरणे, डॉ. आरती दिनकर, स्वप्ना धुपकर, रेखा पौडवाल, प्रज्वलिता गाडगीळ, वैशाली पारोडकर, सोनाली शेणवी देसाई, गीता गावस यांनी सहभाग घेतला.
यशोगाथा
विविध क्षेत्रात कार्य केलेल्या महिलांशी संवाद साधणारा ‘यशोगाथा’ हा कार्यक्रम दुसर्या सत्रात झाला. यात पौर्णिमा केरकर यांनी डॉ. स्नेहा म्हांबरे (प्राध्यापिका), चित्रा क्षीरसागर (सामाजिक कार्यकर्त्यां), लीना पेडणेकर (पत्रकार), सम्राज्ञी मराठे (नाट्य कलाकार), मेधा शिरोडकर (गृहिणी) व प्रज्ञा देसाई (पुनर्वसन मानसशास्त्रज्ज्ञ) यांच्याशी संवाद साधला.