Home बातम्या सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदी शपथबद्ध

सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदी शपथबद्ध

0

अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून काल शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील लोकभवन येथे हा कार्यक्रम अगदी साधेपणाने पार पडला.

सुनेत्रा पवार या शुक्रवारी रात्रीच बारामतीतून मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. काल सकाळपासून मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर राष्ट्रवादीची गटनेतेपदाची महत्त्वपूर्ण बैठक विधीमंडळात पार पडली. यावेळी दिलीप वळसे पाटलांकडून गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. छगन भुजबळ यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाला अनुमोदन देण्यात आले. यानंतर सुनेत्रा पवार यांची एकमताने गटनेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर धनंजय मुंडे, छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, संजय बनसोडे, सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर रवाना झाले. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गटनेते म्हणून सुनित्रा पवार यांची निवड झाल्याचे पत्र दिले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ते पत्र राज्यपालांना पाठवण्यात आले.

यानंतर लोकभवनात संध्याकाळी 5 वाजता शपथविधी सोहळा पार पडला. मर्यादित लोकांना शपथविधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. शपथविधी सोहळा अवघ्या 10 मिनिटांत अत्यंत साधेपणाने पार पडला.

अर्थ खाते तूर्तास राष्ट्रवादीला नाही
अजित पवारांकडे अर्थ, नियोजन अशी महत्त्वाची खाती होती, ही खाती राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) मिळावीत, अशी अपेक्षा पक्षाला होती. मात्र सुनेत्रा पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तूर्तास तरी अर्थ खाते देण्यात आलेले नाही.

सुनेत्रा पवार यांच्याकडे तीन खाती
राज्याच्या 11 व्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही तीन खाती देण्यात आली आहेत, तर अजित पवारांचे नियोजन आणि वित्त हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले आहे.