- विद्या म्हाडगूत
(फोंडा)
घरातल्या सर्व मंडळींनी हसत-खेळत राहिल्यामुळे घराचा स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही. घराचे नियम, निसर्गाचे नियम ज्यावेळी आपण तोडतो तेव्हाच आपल्या नशिबी दुःख येतं. नेहमी दुसर्यांना सुख द्या. तेच सुख तुम्हाला परत मिळेल. सगळ्यांनी हसत खेळत जीवन जगावे, हीच खरी सुखाची गुरुकिल्ली!
सकाळी सकाळी वर्तमानपत्र उघडल्यावर आधी नजर जाते ती आत्महत्या, खून, बलात्कार, दरोडे इत्यादी. दिवाळी असोे, होळी किंवा गणेशचतुर्थी.. कोणतेही सण असूद्या. एक कर्तव्य म्हणून ते आपण पार पाडतो. कुणाच्या चेहर्यावर खुशी नाही, आनंद नाही. लहानापासून मोठ्यापर्यंत जो तो तणावाखाली, हिरमुसलेला दिसतो.
श्वेता आमची शेजारीण, पहाटे मला फुले काढताना भेटली. डोळे सुजलेले, वैतागलेली. हसायचं म्हणून हसली. मी विचारलं, ‘‘काय झालं गं? एवढी ताणलेली का दिसतेस? झोप नाही झाली?’’ तर म्हणाली, ‘‘ताई, दुपारी भेटते मी. आपण बोलू.’’ मी म्हटलं, ‘‘ठीक आहे. ये तू.’’
आम्ही दोघी आवरून बसलो. तिला कधी एकदा मनावरचा ताण हलका करू असं झालं होतं. ती म्हणाली, ‘‘राजन, आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. विचित्रच वागतो. कधीमधी नोकरीला जातो. रात्री उशिरा घरी येतो, तोही दारु पिऊन. कितीदा समजावण्याचा प्रयत्न केला पण ऐकायलाच तयार नाही. उलट हात उगारतो, ओरडतो. मुलं तर अगदी भीतिच्या छायेखाली असतात. काय करावं काहीच सुचत नाही. अशानं नोकरी जाणार’’. हल्ली अशी फारच उदाहरणं मिळतात.
दुसरी गोष्ट सासु-सुनेची! ती तर … घरोघरी मातीच्या चुली… म्हणायला पाहिजे. तसंच मुलं आईवडिलांचं ऐकत नाही, शिक्षण सोडून नको असलेले धंदे, दारु, गुटखा, गांजा, चरस यांच्या आहारी गेलेली.
आमच्या लहानपणी सगळीकडे एकत्र कुटुंबपद्धती जास्त करून असायची. घरात आत्या, काका-काकू, चुलत भावंडं… घर कसं भरल्यासारखं असायचं. मुलं अगदी मजेत, आनंदात असायची. सकाळी शाळा- दुपारी अभ्यास- संध्याकाळी खेळ आणि रात्री निवांत झोप. ताण म्हणून कशाचाच नव्हता. कुठलाही सण असो, सगळ्यांच्या चेहर्यावर आनंद अगदी ओसंडत असायचा. आताच्या सारखी स्पर्धाही नव्हती. खाओ- पिओ- मजा करो… म्हणजे आताचा कार्निव्हल!
मोठ्यांची भांडणं घरात असायचीच… जावा-जावातली भांडणं, सासु-सुनेची भांडणं, शेजार्यांशी भांडणं, पण ती तेवढ्यापुरतीच असायची. मुलांवर त्याचा परिणाम होत नव्हता. आणि आता… कुठे सासु-सुनेचं खटकलं तर सून लगेच माहेरी जाते किंवा वेगळी राहतात. अशानं मुलं एकाकी पडतात. ना बरोबरीची मुले ना खेळ. मग काय टीव्ही आणि मोबाइल. बरं, नवरा-बायको तरी कुठे खुश असतात? त्यांची पण आपसात भांडणं. सतत भांडणामुळे नवर्याचा बाहेरख्यालीपणा, व्यसन… मग मुले आईवडिलांना जुमानत नाहीत., मग शेवटी काय.. पदरी दुःख, मानसिक त्रास, शारीरिक त्रास आणि याचा परिणाम म्हणजे शरीराला होणारे तर्हेतर्हेचे आजार.
नवर्याचं सुख बाहेर नसून ते घरातच आहे हे जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत त्याच्या कपाळी दुःखच असणार. नोकरी करून घरी आल्यावर बायको-मुले हसतमुख दिसायला पाहिजे असतील तर त्याने आपला थोडातरी वेळ बायको-मुलांबरोबर घालवायलाच पाहिजे. प्रेम आणि मान मागून मिळत नाही. तो स्वतःच्या वागण्याने तयार केला पाहिजे. अशा नवर्याला बायको पतीपरमेश्वरच मानणार. तसेच सासुने सुनेला आणि सुनेने सासुला टोमणे मारण्यापेक्षा जे काही चुकीचे आहे ते समोरासमोर उघडपणे बोलायला पाहिजे. त्यामुळे एकमेकींबद्दलचे समज- गैरसमज असतील तर ते मिटतील आणि घरात एकोपा नांदेल. बाहेर एकमेकींच्या चहाड्या करणे, गैरसमज पसरविणे यामुळे केव्हाही घराच्या शांततेला तडा जाऊ शकतो. सुनेनेही सासुकडून किंवा नवर्याकडून फाजील अपेक्षा बाळगू नये. प्रत्येकाची जागा वेगळी असते. बायकोची जागा आई घेऊ शकत नाही आणि आईची जागा बायको घेऊ शकत नाही. दोघींच्या भांडणामध्ये नवर्याची कुचंबणा होते.
घरातल्या सर्व मंडळींनी हसत-खेळत राहिल्यामुळे घराचा स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही. घराचे नियम, निसर्गाचे नियम ज्यावेळी आपण तोडतो तेव्हाच आपल्या नशिबी दुःख येतं. नेहमी दुसर्यांना सुख द्या. तेच सुख तुम्हाला परत मिळेल. सगळ्यांनी हसत खेळत जीवन जगावे, हीच खरी सुखाची गुरुकिल्ली!