कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक क्षेत्राची घडी विस्कळीत झाली असून आता सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आयसीएसई बोर्डानेही परीक्षा रद्द केली आहे.
केंद्राचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे. १ ते १५ जुलै दरम्यान या परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परीक्षेच्या कालावधीतच कोरोनाचा उपद्रव सुरू झाल्याने सीबीएसईच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. त्यानुसार १ ते १५ जुलै पर्यंत या परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र संपूर्ण देशात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, या पार्श्वभूमीवर या परीक्षा रद्द करणे भाग पडले आहे. मागील तीन वर्गामध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या अनुषंगाने मूल्यमापन केले जाईल. आणि त्यातून ज्या मुलांचे समाधान होणार नाही, ते नंतर बोर्डाकडून घेण्यात येणार्या परीक्षा देऊ शकतात.
तुषार मेहता यांनी ही माहिती न्यायालयात काल दिली. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांचे वकील ऋषी मल्होत्रा सर्वोच्च न्यायालयात तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर उपस्थित झाले. जस्टिस खानविलकर या पीठाचे अध्यक्ष होते.