सीएएविरोधातील निदर्शनांदरम्यानच्या हिंसक कारवाया व पोलिसांच्या गोळीबारात काल उत्तर प्रदेशात विविध भागांमध्ये ६ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. कालच्या निदर्शनांदरम्यान या राज्यातील बिजनोर येथे दोन, मीरतमध्ये एक, संभल येथे एक व फिरोजाबाद येथे एक मिळून एकूण ५ जण ठार झाले आहेत. मात्र काही अधिकार्यांनी कानपूरमध्ये एक ठार झाल्याचे सांगितले.
कानपूरमध्ये सीएएविरोधी निदर्शनांदरम्यान झालेल्या हिंसाचारात १३ जण जखमी झाले असून त्यात सहा पोलिसांचा समावेश आहे. पोलिसांनी हिंसाचार करणार्या २५ जणांना ताब्यात घेतले. दरम्यान, समाज माध्यमांद्वारा अफवा पसरविल्या जाऊ नयेत यासाठी इंटरनेट सेवा निलंबित ठेवण्याचा आदेश देण्यात आल्याचे जिल्हा न्यायदंडाधिकारी रविंद्र कुमार यांनी सांगितले.
पोलीस महासंचालक
म्हणतात ५ ठार
राज्याचे पोलीस महासंचालक ओ. पी. सिंग यांनी सांगितले, की बिजनोर येथे दोन व मीरत, संभल व फिरोजाबाद येथे प्रत्येकी एक मिळून पाचजण ठार झाले आहेत. मात्र, अधिकार्यांनी कानपूर येथेही एक ठार झाल्याची माहिती दिली. काही भागांमध्ये पोलिसांवरही जमावाकडून गोळीबार झाल्याचे या अधिकार्यांनी सांगितले.
५० पोलीस जखमी
सिंग यांच्या माहितीनुसार जमावाच्या हल्ल्यात ५० पोलीस जखमी झाले आहेत. लखनौ, कानपूर, अलाबाद, आग्रा, अलीगड, गाझियाबाद, वाराणसी, मथुरा, मीरत, मुरादाबाद, मुजफ्फरनगर, बरेली, फिरोजाबाद, पिलभीत, रामपूर, सहारनपूर, संभल व अन्य अनेक शहरांमधील इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश कुमार यांनी दुजोरा दिला. सोशल मिडियाच्या वापरामुळे आंदोलनाला चिथावणी मिळत असल्याचे ते म्हणाले.
आज रामपूरमध्ये बंद
दरम्यान, गेल्या दोन दिवसांत १५० लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ रामपूर येथे आज शनिवारी बंद पाळण्याचा नागरिकांनी निर्णय घेतला आहे.
सीएए ः दिल्लीत पुन्हा हिंसाचार
देशाच्या राजधानी दिल्लीत कालही सीएएविरोधी निदर्शनांचा जोर कायम राहिला. हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यांवर येऊन सरकारविरोधी घोषणा व पोलिसांबरोबर धुमश्चक्री तसेच वाहन जाळण्याचा प्रकारही या दरम्यान घडला. येथील निदर्शनांचा केंद्रबिंदू जामा मशीद परिसर होता. या मशिदीतील शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर दुपारी जमावबंदी तोडून प्रचंड मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद करीत होते. जामा मशीदपासून जंतरमंतरपर्यंत मोर्चा काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी निदर्शकांना दिल्ली गेट भागात रोखले.
दरम्यान, चंद्रशेखर आझाद यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. मात्र आझाद त्यांच्या तावडीतून निसटले.
दिल्ली गेट
परिसरात हिंसाचार
पोलिसांनी निदर्शकांना दिल्ली गेट भागात रोखण्यासाठी बळाचा वापर केल्यानंतर जमाव हिंसक बनला व दगडफेक सुरू झाली. याच दरम्यान जमावाने एका कारला आग लावली. काही वाहनांचे नुकसान करण्यात आले. या दगडफेकीत एका संयुक्त पोलीस आयुक्तासह अनेक पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर अनेक निदर्शकांना ताब्यात घेतले असल्याची माहिती दिल्ली पोलीस प्रवक्ते एम. एस. रंधावा यांनी दिली.
शर्मिष्ठा मुखर्जी यांना
पोलिसांनी केले स्थानबद्ध
सीएएविरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थाना नजीक निदर्शने करणार्या दिल्ली महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष तथा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शमिष्ठा मुखर्जी व अन्य महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.