Home बातम्या सिलिंडर गॅस चोरी प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

सिलिंडर गॅस चोरी प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

0

कांपाल-मिरामार येथे भरवस्तीत घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस चोरीचे एक प्रकरण उघडकीस आले असून, या प्रकरणात भारत पेट्रोलियमच्या पणजीतील गॅस एजन्सीचे दोन कर्मचारी आणि व्यवस्थापकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संशयितांना नोटीस जारी करण्यात आली
आहे.

ह्या गॅस चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला होता. घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस चोरी करताना दोघांना स्थानिकांनी हटकल्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले होते. कांपाल येथील कॅस्टिल्हो नोरोन्हा यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली होती. गुरुवारी सकाळी 11.30 वाजता मॉम्स किचनच्या मागे ला कापांल कॉलनी येथे हा प्रकार घडला होता. जीए-01-टी-4284 नोंदणी क्रमांक असलेल्या सिलिंडरवाहू टेम्पोतील दोन कर्मचारी आणि फ्रान्सिस मार्टिन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर ठिकाणी गॅस सिलिंडरवाहू टेम्पो वरच्या वर उभा करून ठेवला जात होता. याबाबत विचारणा केल्यास हॉटेलमध्ये डिलिव्हरी करण्यासाठी थांबतो व बिल देण्यासाठी वेळ लागत असल्याचे सांगण्यात येत होते. स्थानिकांनी संशयावरून व्हिडिओ काढला असता त्यात भरलेला व रिकामा सिलिंडर आडवा ठेवला होता आणि छोट्या वायरने भरलेल्या सिलिंडरमधून गॅस रिकाम्या सिलिंडरमध्ये घेतला जात होता. गॅस काढून सिलिंडरला पिवळे सील पुन्हा चिकटवले जात होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली.