सिद्धी नाईक मृत्युप्रकरणातील पोलीस तपासातील कच्चे दुवे आता उघड होऊ लागले असून पोलिसांच्या ढिलाईमुळे गोमेकॉच्या शवविच्छेदन विभागाने तिचा व्हिसेरा ठेवलेला नसल्याने पुन्हा वैद्यकीय चाचणीसाठीचा मार्गच बंद झाला आहे.
सिद्धी नाईक हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवताना पोलिसांनी ती आत्महत्या असल्याचे नमूद करून मृतदेह गोमेकॉत चिकित्सेसाठी पाठवला होता. पोलिसांनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे नमूद केल्याने शवविच्छेदन विभागाने तिचा व्हिसेरा मागे ठेवला नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता पूर्वीच्या शवविच्छेदन अहवालावरच वैद्यकीय पॅनल नियुक्त करून संंशयास्पद मृत्युप्रकरणी निष्कर्ष काढावा लागणार आहे. त्यामुळे सिद्धी नाईक हिच्या मृत्यूप्रकरणातील गुंता सोडवणे कठीण बनणार आहे.
सिद्धी नाईक हिचा १२ ऑगस्ट रोजी कळंगुट समुद्र किनार्यावर मृतदेह सापडला होता. त्यावेळी मृतदेहावर कपडे नव्हते. कुटुंबाने सुरुवातीला पोलिसांना स्पष्ट माहिती न दिल्यामुळे पोलिसांनी हे प्रकऱण आत्महत्या असल्याचे गृहीत धरून शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबाकडे सुपूर्द केला होता.
सिद्धी नाईक हिच्या कुटुंबीयांनी आता जबानी फिरवल्यामुळे पोलिसांसमोर पेच निर्माण झाला आहे. मात्र आता व्हिसेरा ठेवलेला नसल्याने सखोल तपास हाच पर्याय पोलिसांसमोर राहिला आहे.