सावईवेरेत गॅससिलिंडर स्फोटामुळे घर बेचिराख

0
118

खेडे-सावईवेरे येथे काल सकाळी दहाच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट होऊन घर बेचिराख होण्याची घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, काल सकाळी दहाच्या सुमारास खेडे-सावईवेरे येथील आनंदी गोविंद गावडे यांच्या घरात सिलिंडर स्फोट झाला. या घटनेवेळी घरात ज्येष्ठ महिला घराबाहेर काहीतरी काम करत असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

गॅल सिलिंडरचा स्फोट इतका जबरदस्त होता की, बाजूला असणारे फणस व इतर प्रकारच्या झाडांना आगीची धग लागल्यामुळे ती जळत होती. या घटनेत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. तर घरावरील कौले व भिंती ढासळल्या.

या घटनेची माहिती मिळताच फोंडा अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी बंबासह दाखल झाले. परंतु तोपर्यंत घर पूर्णपणे जळाले होते. या घटनेत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. दलाचे जवान दिलेश गावकर, प्रमोद गावडे, देऊ आमोणकर व अधिकारी यांनी आग विझवण्यासाठी परीश्रम घेतले. अग्निशामक दलाने अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिली.

गावडे कुटूंबाला आधाराची गरज

आनंदी गोविंद गावडे यांचे घर आगीत पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्याने गावडे कुटुंबियांवर संकट कोसळले आहे. त्यातच थंडीचे दिवस असूुन, कुटूंबावर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या कुटुंबाला आधाराची गरज आहे. कपडे, धान्य व साहित्यासह घर पूर्णपणे सिलिंडरचा स्फोट होऊन बेचिराख झाल्याने सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊन गावडे कुटुंबियांना आधार द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.