सामूदायिक शेतीला यंदा गती मिळणार

0
5

>> गोवा राज्य कृषिसंचालक संदीप फळदेसाई यांचे प्रतिपादन

यंदा राज्यात सामूदायिक शेतीला (कॉम्युनिटी फार्मिंग) गती प्राप्त होणार असल्याची माहिती कृषिसंचालक संदीप फळदेसाई यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना दिली. याविषयी अधिक माहिती देताना श्री. फळदेसाई यांनी, कृषी खात्याने गेल्या वर्षी सामूदायिक शेतीसाठीचा प्रकल्प हाती घेतला होता. हा अशा प्रकारचा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी थोडी साधनसुविधा उभी करण्याची गरज होती. ती गरज लक्षात घेऊन गेल्या वर्षी या प्रकल्पासाठी शेतीला कुंपण घालण्यासाठीचे काम हाती घेण्यात आले होते. लोखंडी जाळी घालून ही कुंपणाची सोय गेल्या वर्षी करण्यात आली होती. आता हे काम पूर्ण झालेले असल्याने आता खऱ्या अर्थाने राज्यात सामूदायिक शेतीचा प्रकल्प मूर्तरूप घेणार असल्याचा विश्वास फळदेसाई यांनी दै. नवप्रभाशी बोलताना व्यक्त केला.

भातशेती यांत्रिक पद्धतीने

यंदा राज्यात भातशेतीची लावणी ही मोठ्या प्रमाणात यांत्रिक पद्धतीने करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी बोलताना श्री. फळदेसाई यांनी दिली. आता कृषी कामासाठी राज्यात मजूर मिळणे कठीण बनले असून मजुरीचे दरही जास्त असल्याने त्यांच्यावर आर्थिक ताण येत असतो. या पार्श्वभूमीवर यांत्रिक पद्धतीने केली जाणारी शेत लावणी त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे फळदेसाई यांनी स्पष्ट केले. यंदा शेतीसाठी हवा तसा पाऊस आतापर्यंत झाल्याचे फळदेसाई म्हणाले.

चिंचोणे आदर्श गाव ठरेल

गोवा सरकार कृषी उत्पादनाच्याबाबतीत राज्याला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्नरत असून त्याचाच हा एक भाग आहे, असे फळदेसाई यांनी स्पष्ट केले. उत्तर तसेच दक्षिण गोव्यातही यंदा सामूदायिक शेती प्रकल्पाला वेग येणार असल्याचे सांगून दक्षिण गोव्यातील चिंचोणे हे अशा प्रकारच्या सामूदायिक शेतीसाठीचे एक आदर्श असे गाव ठरणार असल्याची माहितीही फळदेसाई यांनी दिली.

शेतकऱ्यांना खत कमी पडू नये यासाठी उपाययोजना

राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे खत विनाविलंब उपलब्ध व्हावे व राज्यात खताचा तुटवडा निर्माण होऊ नये याकडे कृषी खात्याने विशेष लक्ष दिले असून खत उत्पादक काखान्यांना राज्यासाठी जेवढे खत आवश्यक आहे तेवढे खत आरक्षित ठेवण्याचे व ते योग्यवेळी राज्यातील खत उत्पादकांकडे पाठवण्याची सूचना त्यांना केली असल्याची माहितीही फळदेसाई यांनी यावेळी बोलताना दिली. गोव्याला साडेचार हजार मेट्रिक टन एवढ्या खताची गरज दरवर्षी लागते, अशी माहितीही त्यांनी दिली.