>> नॉर्दन आर्क कॅपिटलच्या क्षमा फर्नांडिस
सामान्य, गरीब व्यक्ती कर्ज स्वरूपात घेतलेली रक्कम कधीच बुडवत नाही. कर्जाची परतफेड निष्ठेने केली जाते. नॉर्दन आर्क कॅपिटल ही संस्था समाजातील सामान्य, गरिबाचे राहणीमान सुधारण्यासाठी कर्जाचे वितरण करते. या कर्जाच्या वसुलीचे प्रमाण ९९.५ टक्के एवढे आहे, असे प्रतिपादन नॉर्दन आर्क कॅपिटलच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. क्षमा फर्नांडिस यांनी येथे काल केले.
कला व संस्कृती संचालनालयाने आयोजित १३ व्या डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात डॉ. फर्नांडिस यांनी तिसरे पुष्प गुंतले. तळागाळातील असामान्यांचे सबलीकरण ः एक सर्वसमावेशक जगाचा प्रवास असा व्याख्यानाचा विषय होता.
देशातील अनेक राज्यांत गरिबीचे प्रमाण भरपूर आहे. या गरिबीमुळे मुले शिक्षणापासून सुध्दा वंचित राहतात. देशातील गरिबी हटाव मोहीम हे मोठे आव्हान आहे. देशातील गरिबी समस्येचे वाढते गाभिर्य ओळखून गरिबी हटविण्याच्या क्षेत्रात काम करण्याचा संस्थांचा सहभाग वाढला पाहिजे. युवा वर्गाने या मोहिमेत योगदान देण्याची गरज आहे, असेही डॉ. फर्नांडिस यांनी सांगितले.
नॉर्दन आर्क कॅपिटल ही वित्तीय संस्था देशातील ५८० जिल्ह्यामध्ये संस्था कार्यरत आहे. संस्थेने आत्तापर्यंत ४५ मिलियन गरीब लोकांना आर्थिक साहाय्य केले आहे. अंदाजे ७५ हजार कोटींचे वाटप कर्जाच्या स्वरूपात केले आहे.
महोत्सवाचा आज समारोप
कोसंबी विचार महोत्सवाची सांगता आज गुरुवार ३० जानेवारीला डॉ. छावी राजावत (राजस्थान) यांच्या व्याख्यानाने होणार आहे. डॉ. राजावत या एम.बी.ए. चे शिक्षण घेतलेल्या महिला महिला सरपंच आहेत. जेव्हा महिला राज्य करतील असा डॉ. राजावत यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.