>> सरकारच्या योजनेबाबत जनता अनभिन्न
>> वाहतूक खात्यातर्फे जागृतीची नितांत गरज
राज्यात दरवर्षी वाहन अपघातांमध्ये तीनशेच्या आसपास लोकांचे बळी जात असून सुमारे तीनशे ते साडेतीनशे जणांना अपघातात गंभीर दुखापत होते. तथापि, सरकारच्या रस्ता अपघात पिडीत नुकसान भरपाई साहाय्य योजनेच्या लाभार्थींची संख्या नगण्य आहे. या योजनेचा मागील सात वर्षांत केवळ ८७ जणांना लाभ मिळाला आहे.
वाहतूक संचालनालयातर्फे गोवा राज्य रस्ता अपघात पिडीत नुकसान भरपाई योजनेच्या माध्यमातून रस्ता अपघातात बळी गेलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांना अर्थसाहाय्य केले जाते. राज्यात मागील पाच वर्षांत सुमारे १५१३ रस्ता अपघातात बळी गेले आहेत. तर सुमारे १६०० जण रस्ता अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. तसेच हजारो जण किरकोळ जखमी होत आहेत. राज्यात अपघातात सापडणार्यांची संख्या जास्त असताना वाहतूक खात्याच्या योजनेचा लाभ घेणार्यांची संख्या फारच कमी आहे. या योजनेबाबत जागृतीची नितांत गरज आहे. या योजनेचा लाभ घेणार्यांची संख्या वाढावी या उद्देशाने योजनेतील काही अटींमध्ये दुरुस्ती सुध्दा करण्यात आलेली आहे.
या योजनेचा लाभ घेणार्यांना ठरावीक वेळेत अर्ज सादर करावा लागतो. सुरुवातीला या योजनेखाली दीर्घकालीन नुकसान भरपाईसाठी अर्ज सादर करण्यासाठी ६० दिवसांचा अवधी देण्यात आला होता. या योजनेखाली अर्ज सादर करण्यासाठी अवधी वाढविण्याची मागणी केल्यानंतर आता अर्ज सादर करण्यासाठी १८० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. तसेच आपत्कालीन भरपाई योजनेचा लाभ मिळविण्याचा अवधी ७ दिवसांवरून ३० दिवस करण्यात आला आहे. या योजनेखाली अर्ज सादर करणार्यांना विविध कागदपत्रे सादर करावी लागतात. कागदपत्रे योग्य असलेल्यांना आर्थिक साहाय्य दिले जाते. या योजनेबाबत जनजागृतीची गरज आहे, अशी माहिती वाहतूक खात्याचे उपसंचालक प्रकाश आझावेदो यांनी दिली.
अशी मिळते नुकसान भरपाई
या योजनेखाली रस्ता अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांना २ लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते. अपघातात जायबंदी झाल्यास १.५० लाख रुपयांची नुकसान भरपाई, अपघातात गंभीर जखमी होऊन ६० दिवसांपेक्षा जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्याला १ लाख रुपये नुकसान भरपाई, ७ दिवसांपेक्षा जास्त आणि ६० दिवसांपर्यंत उपचार घेणार्यांना ५० हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाते. ३ ते ७ दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्याला १० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. या योजनेसाठी संबंधिताने अर्ज सादर करून आवश्यक कागदपत्रे सोबत जोडण्याची गरज असते.