>> आयुध निर्माण मंडळाचे विसर्जन
>> पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत घोषणा
संरक्षण दलाचा अविभाज्य भाग असलेले सर्वपरिचित आयुध निर्माण मंडळाचे काल अखेर विसर्जन करण्यात आले असून या मंडळाचे रुपांतर ७ संरक्षण कंपन्यांमध्ये करण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एका आभासी कार्यक्रमाद्वारे घोषित करण्यात आले.
देशात १० राज्यांत ४१ ठिकाणी दारुगोळा – शस्त्र निर्मितीचे कारखाने, असा या आयुध निर्माण मंडळाचा पसारा होता. आता या सर्वांना ७ कंपन्यांमध्ये विभागण्यात आले असून सुमारे ७५ हजार कर्मचारी या मंडळात काम करत आहे. मात्र त्यातील कोणालाही न काढता त्यांना ७ कंपन्यांमध्ये केंद्रीय कर्मचारी म्हणून सामावून घेतले जाणार आहे. ही प्रक्रिया पुढील दोन वर्षात पूर्ण केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या सातही कंपन्या देशातील संरक्षण क्षेत्रात कार्यरत राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी, एकेकाळी जगातील शक्तिशाली संस्थापैकी एक म्हणून आयुधची ओळख होती. काहींकडे चांगल्या सुविधा होत्या, कौशल्ये होती. जागतिक महायुद्धाच्या काळात या संस्थांची ताकद जगाने बघितली होती. स्वातंत्र्यानंतर आधुनिकीकरण करणे आवश्यक होते, काळानुसार बदलण्याची गरज होती. मात्र ते झाले नाही. त्यामुळे परिवर्तनासाठी आता या ७ कंपन्या मोठी भूमिका बजावणार आहेत. गेल्या ७ वर्षात परिस्थिती बदलली आहे. संरक्षण विभागाच्या कारभारात पारदर्शकता आणली असल्याचे सांगितले. या नव्या कंपन्यांबरोबर येण्याचे आवाहन यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केले. या कंपनीच्या माध्यमातून देशाच्या संरक्षण दलाची गरज भागवली जाईलच, त्याचबरोबर निर्यातीकडेही विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले.
या सात कंपन्यांमध्ये मुनीशन्स इंडिया लिमिटेड (एमआयएल) ही कंपनी बंदुकीच्या गोळ्या, तोफगोळे, हँन्डग्रेनेड, रॉकेट लॉन्चरमधील रॉकेट, विविध प्रकारचे बॉम्ब, स्फोटके बनवण्याचे काम करेल. आर्मर्ड व्हेईकल कार्पोरेशन (अवनी) ही कंपनी लष्करासाठी आवश्यक सर्व प्रकारचे रणगाडे, चिलखती वाहने, त्यांचे इंजिन बनवण्याचे काम करेल. प्रगत शस्त्रे आणि उपकरणे इंडिया लिमिटेड (एडब्ल्यूई इंडिया) बंदुका, रायफल, तोफा बनवण्याचे काम करेल. ट्रूप कम्फोर्टस् लिमिटेड (टीसीएल) शिरस्त्राण, विविध प्रकारचे युनिफॉर्म -कपडे- बूट, तंबू, जॅकेटचे उत्पादन करणार आहे. यंत्र इंडिया लिमिटेड (वायआयएल) ही कंपनी लष्करी साहित्य, सुटे भाग तयार करणार आहे. इंडिया ऑप्टेल लिमिटेड (आयओएल) ही कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, ऑप्टीकल उपकरणे, नाईट व्हीजन उपकरणे, लेझरवर आधारीत उपकरणे, विविध प्रकारची वायर्स-केबल यांचे उत्पादन करेल. आणि स्लायडर्स इंडिया लिमिटेड (जीआयएल) पॅराशूट निर्मितीचे काम ही कंपनी करणार आहे.