सात्विक – चिरागची १८व्या स्थानी झेप

0
103

सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीतील नवोदित भारतीय जोडीने काल गुरुवारी जाहीर झालेल्या बीडब्ल्यूएफ क्रमवारीत ‘टॉप २०’मध्ये पुनः प्रवेश करताना कारकिर्दीतील सर्वोत्तम १८वे स्थान मिळविले आहे. अश्‍विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी यांनी एका क्रमाने पुढे सरकताना २५वे स्थान आपल्या नावे केले आहे. सिक्की व प्रणव जेरी चोप्रा यांनी मिश्र दुहेरीत तीन क्रमांकांनी प्रगती साधत २२वा क्रमांक मिळविला आहे.

किदांबी श्रीकांतचे पुरुष एकेरीतील अव्वलस्थान केवळ आठवडाभर टिकविणे शक्य झाले असून ताज्या क्रमवारीत चार स्थानांच्या घसरणीसह तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुष एकेरीचे रौप्यपदक पटकावलेला श्रीकांत मागील गुरुवारी जाहीर झालेल्या क्रमवारीत पहिल्या स्थानी विराजमान झाला होता. संगणकीय पद्धतीचा वापर सुरू झाल्यानंतर क्रमवारीत शिखरावर पोहोचणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनला होता.

बीडब्ल्यूएफ क्रमवारी निश्‍चित करताना मागील ५२ आठवड्यांतील १० सर्वोत्तम कामगिरीचा विचार करण्यात येतो. श्रीकांतने मागील वर्षी सिंगापूर सुपरसीरिजच्या अंतिम फेरीपर्यंत प्रवेश केला होता. भारताच्याच साई प्रणिथने श्रीकांतला नमवून सदर स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेला ५२ आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झाल्याने या स्पर्धेद्वारे मिळविलेल्या गुणांचा यावेळी विचार झाला नाही. याचा फटका श्रीकांतला बसला. या स्पर्धेच्या विजेत्या साई प्रणिथ यालादेखील याची जबर किंमत मोजावी लागली आहे. चार स्थानांची घसरणीसह तो १९व्या क्रमांकावर आला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरीचा गुणांवर कोणताही परिणाम झालेला नाही. या स्पर्धेला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची मान्यता नसल्याने या स्पर्धेत रौप्य पदक जिंकूनही श्रीकांतच्या गुणांत भर पडलेली नाही. एच.एस. प्रणॉयने एका स्थानाची प्रगती साधताना ११वे स्थान प्राप्त केले आहे. महिला एकेरीत पी.व्ही.सिंधूने आपला तिसरा क्रमांक राखण्यात यश मिळविले आहे. तर राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या सायना नेहवालचेदेखील १२वे स्थान कायम आहे. जपानच्या अकाने यामागुचीने तैवानच्या ताय त्झू यिंगला पछाडत पहिल्या क्रमांकावर हक्क सांगितला आहे. आपल्या कारकिर्दीत प्रथमच यामागुची पहिले स्थान मिळवू शकली आहे. नोव्हेंबर २०१७ पासून यामागुची दुसर्‍या तर यिंग पहिल्या स्थानी होती.