>> पंचायत कर्मचारी संघटनेची मागणी
गोवा पंचायत कर्मचारी संघटनेच्या सर्वसाधारण सभेत पंचायत कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गोवा पंचायत कर्मचारी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा टी. बी. कुन्हा सभागृहात काल घेण्यात आली. यावेळी अखिल भारतीय ट्रेड युनियन कॉंग्रेसचे सरचिटणीस ख्रिस्तोफोर फॉन्सेका, अखिल गोवा पंचायत कर्मचारी युनियनचे संतोष नाईक, रॉक डिसिल्वा, नंदा वाघुर्मेकर, जे. जे. पिरीश, अनिल नाईक आणि आनंद तहशीलदार यांची उपस्थिती होती.
पंचायतीच्या क्लार्कचे निवृत्ती वय ६० वर्षे करावे, कमी उत्पन्न गटाच्या पंचायतींना निधी उपलब्ध करावा, पंचायत कर्मचार्यांना पेन्शन, ग्रेच्युईटी व इतर सुविधांचा लाभ द्यावा. पंचायतीमधील रोजंदारी, कंत्राटी कर्मचार्यांना नियमित करावे, पंचायत कर्मचार्यांना २००३ च्या अधिसूचनेप्रमाणे ज्येष्ठ यादी तयार करावी, अशा मागण्या संमत करण्यात आल्या. पंचायत कर्मचार्यांच्या मागण्यांच्या पूर्तीसाठी दुर्लक्ष करण्यात येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. या सभेत कामगार नेते फॉन्सेका यांनी मार्गदर्शन केले.