सांधेदुखीसारखे वातरोग व त्यांवर उपाय

0
27
  • सौ. मनाली महेश पवार

पूर्वी सांधेदुखी वातव्याधी म्हणजे वार्धक्याची चाहूल मानली जायची. आज आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे वाताचे विकार अगदी लहानापासून वृद्धापर्यंत- सर्व वयोगटांत- जीवनाच्या कुठल्याही टप्प्यावर मनुष्याला ग्रासत आहेत. वातदोष प्राकृत अवस्थेत आरोग्य निरोगी ठेवतो व हाच वातदोष जेव्हा बिघडतो तेव्हा 80 हून अधिक प्रकारच्या वातव्याधी निर्माण होतात.

पूर्वी सांधेदुखी वातव्याधी म्हणजे वार्धक्याची चाहूल मानली जायची. आज आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे वाताचे विकार अगदी लहानापासून वृद्धापर्यंत- सर्व वयोगटांत- जीवनाच्या कुठल्याही टप्प्यावर मनुष्याला ग्रासत आहेत.
वातदोष प्राकृत अवस्थेत आरोग्य निरोगी ठेवतो व हाच वातदोष जेव्हा बिघडतो तेव्हा 80 हून अधिक प्रकारच्या वातव्याधी निर्माण होतात. आधुनिक शास्त्राप्रमाणेदेखील संधिवात (अर्थराइटिस) शंभरहून अधिक प्रकारचे मानले जातात. त्यांच्या मते ऑस्टियोआर्थ्रायटिस, ऑस्टियोपोरोसिस, आरए, गाउट, स्पॉन्डिलायटिस इत्यादी अनेक संधिवाताचे प्रकार आहेत. हे सगळे प्रकार आयुर्वेदशास्त्राने वातव्याधीमध्ये समाविष्ट केले आहेत.

वातव्याधी म्हणजे नेमके काय?
जे आजार फक्त आणि फक्त ‘वातदोष’ बिघडल्यावर उत्पन्न होतात त्या सगळ्यांना वातव्याधी म्हटले जाते. कप, पक्षाघात यांसारख्या व्याधी केवळ वातामुळेच उत्पन्न होतात. अशा आजारांना वातव्याधी म्हणतात. वायू हा अतिशय बलवान व आशुकारी असल्याने त्याने उत्पन्न होणारे विकार तितकेच बलवान, आशुकारी व त्वरित घात करणारे असतात.

प्राकृत वायू म्हणजे काय?
प्राकृतावस्थेतील वायू हा शरीराची उत्पत्ती, वाढ, धारणा, विनाश आदी सर्वच गोष्टीस कारणीभूत असतो. वायू हा सर्वव्यापी आहे. शरीराचे धारण करणारा व सर्व क्रियांना कारणीभूत ठरणारा वायू पाच प्रकारचा असतो. प्राण, व्यान, उदान, समान, अपान हे ते पाच प्रकार. या पाच वायूंची शरीरात विशिष्ट स्थाने व विशिष्ट कामे आहेत. त्याचप्रमाणे सूक्ष्म, चल, शीत, रुक्ष, खट असे या वायूचे गुण आहेत. यांत बिघाड झाला म्हणजे वाताचे विविध रोग उत्पन्न होतात.

वातव्याधीची विविध कारणे
आयुर्वेदशास्त्रात वातव्याधी उत्पन्न होण्याची विविध कारणे सांगितली आहेत आणि आजच्या घडीला ती तंतोतंत जुळताना दिसतात. आजचे राहणीमान, आहारपद्धती, व्यवसायपद्धती इत्यादी पाहता वातव्याधी निर्माण होण्याची कारणे आपल्याला स्वतःलाच मिळतील.

  • आयुर्वेदशास्त्राप्रमाणे रुक्ष, शीत, अल्प, लघु, तिक्त, कटू, कषाय अशा अन्नाचे सेवन करणे हे वातविकारांचे महत्त्वाचे कारण होय. आजची आहारपद्धती पाहता ही कारणे सांप्रतच्या जीवनपद्धतीला अगदी तंतोतंत जुळणारी आहेत. आपण त्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उदा. फास्ट फूड, जंक फूड, पॅकेज फूड, कोल्ड्रिंक्स, चटपटीत- मसालेदार- तळलेले पदार्थ अल्प-डायटिंगच्या नावाखाली कमी प्रमाणात खाणे.
  • अतिप्रमाणात मांसाहार सेवन, पदार्थ बनवण्याची चुकीची पद्धत, मांसाहारसुद्धा भरपूर तेलात तळून खाणे, मांसाहारामध्ये दही घालून पदार्थ बनवणे. हे सर्व म्हणजे सध्या आहार सेवनपद्धत ही जीभेला रूच देणारी आहे; आरोग्यदायी नाही.
  • चिंता, ताण, तणाव हेही पक्षाघात, आमवात, भ्रमसारख्या वातविकारांची महत्त्वाची कारणे आहेत.
  • अतिश्रम, आघात, उपवास, वेगविधारण या सर्व गोष्टी वातप्रकोपाला कारणीभूत आहेत.
  • अतिजागरण हेही वातविकाराचे महत्त्वाचे कारण आहे.

वातविकाराची सामान्य लक्षणे

  • दुखणे, सुज येणे. उदा. सांध्यामध्ये दुखणे, सुज येणे.
  • हस्त, पाद, पुष्ट, शिरप्रदेश या ठिकाणी जखडल्याप्रमाणे वेदना.
  • अंगशोष.
  • निद्रानाश.
  • शिर, नसा, नेत्र, जत्रु-ग्रीक इत्यादी शरीरावयवांच्या ठिकाणी वक्रता या प्रकारची अन्य लक्षणे वातव्याधीमध्ये आढळतात. वर दिलेली सर्वच्या सर्व लक्षणे प्रत्येक ठिकाणी असतात असा मात्र याचा अर्थ नव्हे.

वातव्याधीची सामान्य चिकित्सा व उपाय

  • वाताची चिकित्सा करताना स्नेहाचा उपयोग करावा. स्नेहामुळे वायूचा नाश होतो. शरीरावयवांची रुक्षता वगैरे लक्षणे स्नेहनाने कमी होऊन त्याठिकाणी स्निग्धता, मृदुता येत असते. साहजिकच शरीरावयवांच्या ठिकाणी सम पावलेल्या वायूला अनुलोम गती प्राप्त होते व तद्जन्य उत्पन्न झालेले विकारही कमी होतात.
    यासाठी स्नेहन जे करावयाचे ते सर्व तऱ्हेने करावे लागते. स्नेहपान, अभ्यंग, शिरोबस्ती, अनुवासन बस्ती वगैरे. स्नेहनासाठी तूप, तेल, वसा, मज्जा यांपैकी कोणताही स्नेह चालेल. पण वातासाठी सर्वात चांगले स्नेहद्रव्य म्हणजे तेल. स्नेहद्रव्यानी शरीर तृप्त झाले की मग स्वेदन करावे.
  • स्नेह-स्वेदनाने विकृत अवयव पुन्हा पूर्वस्थितीत येतात. शुष्क धातूंचे उत्तम प्रकारे पोषण होते. त्यांना सहनन प्राप्त होते. बल, अग्नी, प्राण आणि एकंदरित शरीराची धारणाशक्ती वाढीस लागते.
  • वातरोगामध्ये बस्ती हाही एक श्रेष्ठ उपक्रम आहे. कुशल वैद्याच्या मार्गदर्शनाखाली औषधीसिद्ध तेलाचा किंवा काढ्याचा बस्ती घ्यावा.
  • वातरोगामध्ये उपयोगी औषधी द्रव्यांमध्ये बला, अश्वगंधा, शतावरी, माप, कोहळा इत्यादी द्रव्ये श्रेष्ठ आहेत.
  • अभ्रक, लोह, वंग, रौप्य, सुवर्ण यांसारख्या खनिजद्रव्यांची भस्मे वापरावीत.
  • उपस्तंभीत वातव्याधी असल्यास दीपन-पाचन, रुक्ष-उष्णवीर्य, कटु विपाकी अशी औषधे वापरावी लागतात. या प्रकारात स्नेह पूर्णतः वर्ज असतो. केवळ स्वेदन करावे. मृदू अनुलोमन घ्यावे. औषधांमध्ये गुग्गुळ कल्प श्रेष्ठ आहेत. औषधांत अनुपात म्हणून वातरोगामध्ये मध किंवा गरम पाणी उपयुक्त ठरते. त्यामुळे वातरोगात नुसते तेलाने व्याधी बरी होईल म्हणून फक्त मालीश ही चिकित्सा नव्हे. त्यासाठी योग्य तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरचाच सल्ला घ्यावा.
    वाताच्या विकारांमध्ये वातरोग उत्पन्न होऊ नयेत म्हणून काळजी घ्यायची असते व ती सुरुवात अगोदरपासूनच करावी. आज मुलाच्या जन्मानंतर तेलाने मालिश केली जात नाही. कानामध्ये तेल घातले जात नाही. केसांना तेल लावले जात नाही. सुतिकाही तेल लावण्यापासून वंचित झाल्या आहेत. स्त्री प्रसूत व्हायला वातच कारणीभूत असतो व हा प्रकूपित वात शांत व्हायला तेलाची गरज असते.
  • त्याचबरोबर लहान मुलांची हाडे बळकट व्हायला, मांसाचे पोषण व्हायलाही तेल गरजेचे असते.
  • केस रुक्ष झाले म्हणजे वात वाढला तर केस गळतात. मग यासाठीही शिरोबस्ती, शिरोधारा किंवा तेलाने मालिश करणे आवश्यक ठरते. म्हणून नेहमी केसांना तेल लावावे.
  • साधारण दर पंधरा दिवसांनी एकदातरी एरंड स्नेह घ्यावा. त्याने अपानवायू सुस्थितीत राहतो.
  • जेवणामध्ये रोज तूप, दूध, लोणी यांसारख्या आहारीय द्रव्यांचा उपयोग करावा.
  • कानाचे वातविकार न होण्यासाठी कर्णपूरण करावे.
  • नियमित वेळेवर जेवावे.
  • मनाची प्रसन्नता राहील याची काळजी घ्यावी.
  • आहार स्निग्ध, मधुर व हलका असावा.
  • रोज किमान अर्धा तास तरी व्यायाम करावा. हालचाल करणे खूप गरजेचे असते.