माकडमनाच्या नाना लीला

0
20

योगसाधना- 626, अंतरंगयोग- 212

  • डॉ. सीताकांत घाणेकर

सकाळी उठून ध्यान केले तर मानसिक आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरते. अशावेळी भगवंताची बोधवाक्ये वाचावीत, त्यावर चिंतन करावे. मोबाईल जसा चार्ज केल्यावर त्याची शक्ती वाढते, तशीच व्यक्तीची आत्मशक्ती वाढते.

चिंतन करताना अनेकवेळा एक विचार येतो, तो म्हणजे, सृष्टिकर्ता व त्याची अचाट निर्माणशक्ती… ती त्याची विविधता- सुंदर निसर्ग, त्यातील अनेक जीव… प्रत्येक जागा वेगळी, प्राणी वेगळा… यांतील अत्यंत बुद्धिमान म्हणजे मानव प्राणी. बुद्धीबरोबरच चौकस वृत्तीचा, सतत नवे-नवे शोधणारा, वेगवेगळ्या क्षेत्रांत प्रगती करणारा… अत्यंत अध्ययनशील.
अध्ययन म्हणजे अभ्यास. विविध विषयांचा, क्षेत्रांचा. पूर्वीच्या काळी हे ज्ञान पुस्तकरूपाने मिळत होते अथवा कुणाच्या तरी प्रवचनांतून, कीर्तनातून. पण आजच्या युगात ज्ञानाचा स्फोट झाला आहे. वर्तमानपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, फेसबुक, ट्वीटर, वॉट्सॲप… म्हणजे मीडिया व सोशल मीडिया यांतून कुठल्याही विषयावर ज्ञान मिळते. त्याशिवाय यू-ट्यूब, गुगल आहेतच!
सृष्टिकर्त्याने मानवाला विविध शक्ती दिल्या. त्यांत काही अत्यंत प्रभावी आहेत. काही शक्ती खालीलप्रमाणे-

विद्युत ः या शक्तीमुळे वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनेक यंत्रे चालतात. यासाठी वेगळ्या यादीची गरज नाही. प्रकाशदेखील मिळतो. आमच्या बालपणात प्रत्येक खोलीत व बाहेर मिणमिणते दिवे, समया, निरंजनं असायची.

संपर्क ः संपर्क साधण्यासाठी विविध उपकरणे आहेत. उदा. टेलिफोन, वायरलेस… आता मोबाईल. पूर्वीच्या पिढीला टेलिफोन म्हणजे काय हे माहीत आहे. दुसऱ्या गावात अथवा परदेशात संपर्क साधण्यासाठी पुष्कळ वेळ जायचा. हल्लीच्या उपकरणांमुळे संपर्क लगेच- काही सेकंदातच साधता येतो. त्यामुळे बातम्या लगेच सगळीकडे पसरतात.
आता तर ‘व्हायरल’ हा शब्द गावागावांत सर्वांनाच माहीत आहे. येथे मुख्य मुद्दा म्हणजे या बातम्या विविध तऱ्हेच्या असतात- चांगल्या, वाईट, भयानक, सकारात्मक, नकारात्मक.
विज्ञानाच्या प्रगतीमुळे फक्त लिखित संदेशच नाही तर फोटोदेखील व्यवस्थित पोचतात. काही व्यक्ती संपादन न करता अगदी अनावश्यक फोटोदेखील पाठवतात. तसेच एकच मुद्दा विविध व्यक्तींकडून आपल्याकडे येतो. त्यामुळे प्रत्येक ‘वॉट्सॲप’ ग्रुप बघणे शक्यच नसते. बघितलेच तर तो संदेश हटवण्यासाठी (डिलिट करण्यासाठी) आणखी वेळेचा अपव्यय होतो. म्हणूनच केव्हा केव्हा संदेश एकाच वेळी हटवावे लागतात.

खरे म्हणजे मीडिया हा अनेककडे पोचण्याचा अत्यंत प्रभावी उपाय आहे. येथे पत्रकारांची जबाबदारी जास्त आहे. कोणत्या बातमीला प्राधान्य द्यावे, कोणती बातमी ठळक ठिकाणी लावावी व कोणती बातमी कोपऱ्यात लावावी, कोणत्या बातमीचा मथळा मोठा करावा व कोणत्या बातमीचा छोटा… बहुतेकवेळा वर्तमानपत्रात नकारात्मक बातम्यांना प्राधान्य दिले जाते. अपवाद जरूर आहेत.
त्याशिवाय अनेक राजकीय पक्षांची मुखपत्रे असतात. त्यामुळे त्यांच्या चांगल्या बातम्या लगेच पसरतात. काही वर्तमानपत्रे तटस्थ असतात. प्रत्येक वर्तमानपत्राची काही ध्येये असतात, त्याप्रमाणे बातम्या बदलतात.
बातम्या देणे म्हणजे घडलेल्या घटना जनतेसमोर आणणे. हे तर पत्रकारांचे कर्तव्यच असते. त्यात चुकीचे काहीच नाही. पण जेव्हा बातमी नकारात्मक असते तेव्हा आपल्या वर्तमानपत्राचा खप वाढवण्यासाठी त्या बातम्यांना प्राधान्य देणे हे कितपत योग्य आहे? म्हणून प्रत्येक क्षेत्रात, पेशात नैतिकतेचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे. त्या वर्तमानपत्राला सामाजिक प्रतिष्ठा लाभते, ती टिकवण्याचा प्रयत्न प्रत्येक घटकाने करायला हवा.
आजच्या युगात अनेकांंना एक सवय असते. सकाळी उठल्याबरोबर चहा पिता-पिता वर्तमानपत्र वाचणे, दूरदर्शनवरील बातम्या बघणे. आता तर मोबाईलवरील संदेश बघणे. यातील नकारात्मक बातम्यांमुळे मनावर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जशी मोबाईलची बॅटरी ‘डिस्चार्ज’ होते तशी आत्मशक्ती कमी होते. त्याचप्रमाणे अनेकजण झोपण्याच्या आधी दूरदर्शनवरील बातम्या बघतात. येथेदेखील तोच परिणाम होतो.
अनेकांची त्यामुळे कामाच्या वेळी चिडचिड होते व रात्रीच्या वेळी झोप शांत लागत नाही. अनेकांच्या आरोग्यावर त्यामुळे दुष्परिणाम दिसतात. हल्लीच्या काळात मनोदैहिक रोग वाढण्याचे हे एक कारण आहे.
येथे दोन्ही घटक जबाबदारीने वागायला हवेत- बातम्या देणारे आणि वाचणारे, ऐकणारे. बातम्या देणाऱ्यांनी लोककल्याण कशात आहे त्याप्रमाणे बातम्यांवर भर दिला पाहिजे. नकारात्मक बातम्यांबरोबर त्यावर उपाय सुचवला तर बरे होईल. अनेक वर्तमानपत्रांची संपादकीये मुख्य मुद्यांवर चांगली मते मांडतात.

लोकमान्य बालगंगाधर टिळक पत्रकारितेचे एक आदर्श होते. अनेक नामांकित पत्रकारांनी त्यांचे व्रत चालू ठेवले आहे. ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यसंग्रामाच्या लढ्यात टिळकांचे नाव अजरामर राहिले.
बातम्या ग्रहण करणाऱ्यांनीदेखील फार दक्षता पाळायला हवी. जसे शरीरासाठी विविध तऱ्हेचे पौष्टिक अन्न असते तसेच मनासाठी हे सर्व साहित्य असते. अध्यात्म क्षेत्रात सांगितले जाते की, सकाळी उठल्यानंतर अर्धा तास व रात्री झोपण्याच्या आधी अर्धा तास चांगले सकारात्मक विचार श्रवण-पठण करावेत. सकाळी उठून ध्यान केले तर मानसिक आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरते. अशावेळी भगवंताची बोधवाक्ये वाचावीत, त्यावर चिंतन करावे. मोबाईल जसा चार्ज केल्यावर त्याची शक्ती वाढते, तशीच व्यक्तीची आत्मशक्ती वाढते. दिवसभरात नकारात्मक गोष्टींचा जास्त परिणाम अशा व्यक्तींवर होत नाही. ते शांत राहतात.
कामाच्या ठिकाणी तर प्रत्येक क्षेत्रात विविध समस्या येतातच. अशावेळीदेखील मध्ये-मध्ये एक-दोन मिनिटे शास्त्रशुद्ध ध्यान केले तरी फार उपयोग होतो. मुख्य मुद्दा म्हणजे ध्यान करताना आपण कसले ध्यान करतो याचे भान ठेवणे आवश्यक असते. नाहीतर आपले माकडमन कुठेही भरकटत जाईल. स्वतःच्या ध्येयाचे ध्यान केले तर ध्येय सिद्ध व्हायला मदत होईल.
भगवंताने मानवाला दिलेली आणखी एक अत्यंत प्रभावी शक्ती म्हणजे बोलण्याची शक्ती. यासाठी आवश्यक शस्त्र म्हणजे जीभ. बोल विविध तऱ्हेचे असतात- चांगले, कल्याणकारी, सुख देणारे, तसेच वाईट, दुःख देणारे. केव्हा केव्हा अंतःकरणाला झोंबणारे. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात विविध अनुभव येतच असतात.

अशाच टोचणाऱ्या बोलांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे द्रौपदी. दुर्योधनाला उद्देशून तीचे बोल- ‘आंधळ्याचा मुलगा आंधळा!’ ज्यामुळे महाभारत घटले असे इतिहासकार सांगतात. काहीजणांच्या मताप्रमाणे द्रौपदी तसे बोलायला बालिश नव्हती. ती राजकन्या होती. शूर वीरांची पत्नी होती, द्रुपदकन्यका होती, ती राजेशाही घराण्यातील होती. खरे-खोटे देव जाणे. महाभारत घडले हे सत्य आहे. आजदेखील अनेक क्षेत्रांत महाभारत घडते आहे- कुटुंबात, समाजात, राजकीय क्षेत्रात…
सारांश एकच- बोलण्याच्या आधी विचार करावा. एकदा बोलून पश्चात्ताप करण्यापेक्षा अगोदरच काळजी घ्यावी.