राज्याच्या काही भागांमध्ये डेंग्यूने डोके वर काढले असून, राज्यात हळूहळू डेंग्यू रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आरोग्य खात्याची चिंता वाढू लागली आहे. राजधानी पणजी जवळपासच्या सांताक्रूझ येथे डेंग्यूचे तब्बल 20 रुग्ण आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. सातांक्रूझ पंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये डेंग्यूची बाधा झालेले तब्बल 12 रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रभागात डेंग्यूसंबंधीची जागृती मोहीम हाती घेण्यात आली. याच पंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये डेंग्यूचे 8 रुग्ण आढळून आले आहेत. या दोन्ही प्रभागांत मिळून डेंग्यूचे 20 रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सांताक्रूझ मतदारसंघातील लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. डेंग्यूचा फैलाव नियंत्रणात यावा यासाठी सांताक्रूझ पंचायतीने आरोग्य केंद्राच्या मदतीने प्रभाग क्रमांक 6 मध्ये जागृती मोहीम हाती घेण्यात आली. तसेच उर्वरित प्रभागांतही जागृती मोहीम राबवण्यात येणार आहे.