सांताक्रु्र्रझच्या आमदारांचा ग्रेटर पीडीए सदस्यपदाचा राजीनामा

0
57

>> जाहीर सभेत राजीनामा धर्मगुरूंकडे सादर

>> जनतेबरोबर असल्याचे आश्‍वासन

सांताक्रुझचे आमदार आंतोनिओ ऊर्फ टोनी फर्नांडिस यांनी काल ग्रेटर पणजी पीडीएच्या सदस्यपदाचा राजीनामा सरकारकडे सुपूर्द करणार असल्याचे सांताक्रुझ येथे नव्या पीडीएला विरोध करण्यासाठी आयोजित सभेत जाहीर केले. आपण सांताक्रुझवासियांबरोबर राहणार असल्याचे ठोस आश्‍वासन देत त्यांनी सदर राजीनामा स्थानिक धर्मगुरूकडे सुपूर्द केला.

रुदाल्फ फर्नांडिस यांनी आपल्या भाषणात आमदार टोनी फर्नांडिस यांना ग्रेटर पणजी पीडीएबद्दल भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले होते. आमदार टोनी यांनी ते स्वीकारून आपण पीडीएच्या पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. आपणाला त्यात रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने लोकांची कशी फसवणूक केली आहे याचा पाढाही त्यांनी जाहीर सभेत वाचून दाखविला. आपल्या राजीनाम्याची प्रत लोकांसमोर उंचावून हा आपला राजीनामा असून तो चर्चच्या धर्मगुरूंनी स्वीकारण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर तो रीतसर सरकारकडे सुपूर्द करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या या निर्णयाचे टाळ्या वाजवून स्वागत केले.

आपण योग्यवेळी ग्रेटर पणजी पीडीए सदस्यपदाचा राजीनामा देणार असल्याची भूमिका त्यांनी यापूर्वी घेतली होती. पण वाढत्या दबावामुळे काल जाहीर सभेत त्यांना राजीनाम्याची घोषणा करावी लागली. या पीडीएला लोकांचा विरोध असल्याने आपण लोकांबरोबर राहणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. तत्पूर्वी, काल संध्याकाळी ५ वाजता आयोजित मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी मोठ्या संख्येने स्थानिक उपस्थित होते.

मेणबत्त्या प्रज्वलित करून सांताक्रुझ परिसर, राष्ट्रीय महामार्गावरून शांततेने हा मोर्चा परत चर्च मैदानावर परतल्यावर या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. या मोर्चात आमदार टोनी फर्नांडिस, स्थानिक चर्चचे धर्मगुरू, समाजसेवक रुदाल्फ फर्नांडिस, सांताक्रुझ, सांत आंद्रे मतदारसंघातील सरपंच व पंच सदस्यांनी मोर्चात सहभागी होऊन विरोध दर्शविला. आमका पीडीए नाका, अवर विलेज इज अवर ओपीनियन, वी से नो टू पीडीए अशा अनेक निषेध फलकांनी सांताक्रुझवासियांनी लोकांचे लक्ष वेधून घेताना शांततेत मोर्चा काढून सरकारला आपल्या ताकदीचे प्रदर्शन घडविले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वत्र पोलीस बंदोबस्त होता.