>> कालापूरची जलवाहिनी फुटल्याने भीषण संकट
>> माशेल, कुंभारजुवेला अखेर पाणीपुरवठा सुरू
तिसवाडी तालुक्याला पाणीपुरवठा करणारी केरये – खांडेपार येथील मुख्य जलवाहिनी फुटल्यानंतर सांताक्रुझ आणि सांत आंद्रे या मतदारसंघांना पुरवठा करणार्या मुख्य जलवाहिनीला कालापूर येथे पडलेले भगदाड दुरुस्त करण्यात काल यश न आल्याने या भागातील जनतेला सलग ९ दिवस भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. दरम्यान, कुंभारजुवे, माशेल, बाणस्तारी व आसपासच्या भागांना पाण्याचा पुरवठा करणार्या ७५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम काल पूर्ण करण्यात आले असून पाणीपुरवठा करण्यास प्रारंभ झाला आहे.
काल अधूनमधून कोसळणार्या पावसाच्या सरींमुळे कालापूर येथे जलवाहिनी दुरूस्तीच्या कामात अडथळा आल्याने ते पूर्ण होऊ शकले नाही. काल रात्रीपर्यंत युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू होते. सुग़वातीला खांडेपार आणि नंतर कालापूर येथील जलवाहिनी फुटल्याने सांताक्रुझ, सांत आंद्रे भागातील नळ गेले नऊ दिवस कोरडे आहेत. बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळाचा पाणीपुरवठा ठप्प असल्याने मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाइकांना त्रास सहन करावे लागत आहेत. टँकरच्या माध्यमातून पर्यायी पाण्याची सोय अपुरी असल्याने दुर्गंधीचा त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. कुडका, आगशी, बांबोळी, कालापूर, सांताक्रुझ आदी परिसरात लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहे.
कालापूरची जलवाहिनी १३ वेळा फुटली
कालापूर – सांताक्रुझ या भागात राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करताना आत्तापर्यंत १३ वेळा पाण्याचा पुरवठा करणार्या जलवाहिनी फुटली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी रस्ता रुंदीकरणात येणारी जलवाहिनी प्राधान्यक्रमाने रस्त्याच्या बाजूने घालण्याच्या सूचनेकडे ठेकेदाराकडून दुर्लक्ष केले जात आहे, अशी तक्रार आहे.
महामार्गाच्या ८ मीटर खाली जलवाहिनी
बांबोळी, सांतआंद्रे मतदारसंघातील विविध भागात पाण्याचा पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण क्षेत्रामध्ये येत आहे. ही जलवाहिनी रस्त्याच्या बाजूला घालण्याचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. रस्ता रुंदीकरण क्षेत्रात येणारी जलवाहिनी न हटविता ठेकेदारांनी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे. जुन्या जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणात मातीचा भराव घातल्याने सदर जलवाहिनी वरच्यावर फुटत आहे.
माशेल, कुंभारजुवेत पाणीपुरवठा सुरू
कुंभारजुवा, माशेल, बाणस्तारी आणि आसपासच्या भागात नवव्या दिवशी नळाद्वारे पाणी पुरवठ्याला सुरुवात करण्यात आली आहे. केरये. खांडेपार येथे १५ ऑगस्ट रोजी फुटलेल्या दोन प्रमुख जलवाहिन्यांपैकी ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची सात दिवसांनी दुरुस्ती करून पणजीला पाणी पुरवठ्याला सुरुवात झाली. तर, कुंभारजुवा, माशेल, बाणस्तारी व आसपासच्या भागांना पाण्याचा पुरवठा करणार्या ७५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरूवारी पूर्ण करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळपासून या जलवाहिनीतून कमी दाबाने पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे संध्याकाळ उशिरापर्यंत बाणस्तारी, माशेल आदी परिसरात नळांद्वारे पाणी पुरवठ्याला सुरुवात झाली, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी दिली.
कालापूरला आज पाणीपुरवठा
कालापूर येथे फुटलेल्या जलवाहिनीची शुक्रवारी रात्रीपर्यंत दुरुस्ती करून पाणी पुरवठ्याला सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी दिली. काल दुरुस्ती पूर्ण करण्याचे जोरदार प्रयत्न करण्यात आले. मात्र, पावसामुळे वेल्डिंगच्या कामात अडथळा आल्याचे अधिकार्यांनी सांगितले.