सहा पालिकांसाठी ३२३ अर्ज वैध

0
200

>> पणजी मनपासाठी १०६ उमेदवार रिंगणात, आज स्पष्ट होणार अंतिम चित्र

येत्या २० मार्च २०२१ रोजी राज्यात होणार्‍या पणजी महानगरपालिका, सहा नगरपालिका मंडळ, पंचायत व जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी एकूण ५०५ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. पणजी नगरपालिकेच्या ३० प्रभागातून १०६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर सहा नगरपालिकांमध्ये ३२३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. कुंकळ्ळी नगरपालिकेतील एक उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला आहे. आज शनिवार दि. ६ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

डिचोली नगरपालिकेत ७६ उमेदवार, वाळपई नगरपालिकेत ३४ उमेदवार, पेडणे नगरपालिकेत ४५ उमेदवार, कुंकळ्ळी नगरपालिकेत ६७ उमेदवार, कुडचडे-काकोडा नगरपालिकेत ५९ उमेदवार आणि काणकोण नगरपालिकेत ४२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शनिवारी संध्याकाळी निवडणुकीचे एकूण चित्र स्पष्ट होणार आहे.
राज्यातील ग्रामपंचायतीच्या २२ प्रभागातून ६६ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. नावेली जिल्हा पंचायत मतदारसंघात ७ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. साखळी नगरपालिकेच्या प्रभाग ९ मधील पोटनिवडणुकीसाठी ३ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

वाळपई पालिकेत
एक बिनविरोध
वाळपई नगरपालिकेच्या प्रभाग ८ मध्ये निर्मला महेश साखळकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असून त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली जाणार आहे.
सत्तरी तालुक्यातील म्हावशी ग्रामपंचायतीच्या प्रभाग २ मध्ये विठो शामू वरक, भिरोंडा ग्रामपंचायतीच्या प्रभाग ३ मध्ये निकिता नंदा नार्वेकर आणि चिखली ग्रामपंचायतीच्या प्रभाग २ मध्ये स्टेफनी लुकस यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली जाणार आहे.

‘त्या’ पाच पालिकांसाठी
१९३ उमेदवारी अर्ज दाखल
राज्यातील पाच नगरपालिकांच्या २१ मार्चला होणार्‍या निवडणुकीसाठी आणखी १९३ उमेदवारी अर्ज काल दाखल करण्यात आले आहेत. या पाच नगरपालिकांमध्ये आत्तापर्यंत २०८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शनिवार ६ मार्चला उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिवस आहे. म्हापसा नगरपालिकेत २६ उमेदवारी अर्ज, मडगाव नगरपालिकेत ३८ उमेदवारी अर्ज, केपे नगरपालिकेत ४२ उमेदवारी अर्ज, सांगे नगरपालिकेत २० उमेदवारी अर्ज आणि मुरगाव नगरपालिकेत ६७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

दत्तप्रसाद नाईक यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी

पणजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाशी बंड करणारे भाजप नेते दत्तप्रसाद नाईक यांची काल पक्षाने प्रवक्तेपदावरून उचलबांगडी केली.
भाजपचे पणजीचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांच्या नेतृत्वाखालील पणजी महापालिका निवडणुकीसाठीच्या भाजप पॅनलला विरोध करूनया पॅनलविरोधात लढणार्‍या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केल्याबद्दल भाजपने काल दत्तप्रसाद नाईक यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली. मात्र, पक्षाने वेगवेगळ्या पदाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या पदांची फेररचना करण्यात येत असून त्यासाठीच नाईक यांना प्रवक्तेपदवरून हटवले असल्याचे म्हटले आहे.