सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतरच निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा

0
167

>> गिरीश चोडणकर यांचे आयोगाला पत्र

गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राज्य निवडणूक आयोगाला लिहिलेल्या एका पत्रातून एकदा सुरू केलेली कुठलीही निवडणूक प्रक्रिया ही अचानक थांबवू अथवा बंद करू येत नसून नंतर पुन्हा सुरू करता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निवाडानंतरच निवडणुकीबाबत काय तो निर्णय घ्यावा, असे पत्रातून स्पष्ट केले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने नगरपालिका प्रशासनाने पालिका निवडणुकांसाठी केलेले प्रभाग आरक्षण रद्द करण्याबरोबरच आयोगाने निवडणुकीसाठी काढलेली अधिसूचनाही रद्द केली होती ही बाब आयोगाच्या नजरेस आणून दिली आहे.

१ मार्च २०२१ रोजी निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली. (उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार) निवडणुकीसंबंधीची अधिसूचना १ मार्च २०२१ ते ४ मार्च २०२१ पर्यंत स्थगित होती. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती आणली आहे. त्यांनी निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा आदेश दिलेला नाही. तसेच ४/३/२०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा फक्त सांगे नगरपालिकेशी संबंधीत असल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे.

याचाच अर्थ पूर्वीच्या अधिसूचनेनुसार राज्य निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रिया पूर्ण करू शकत नसल्याचे चोडणकर यांनी स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने फक्त उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती आणली आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा आदेश दिला नसल्याचे चोडणकर यांनी आपल्या पत्रातून स्पष्ट केले आहे.
त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालय आपला अंतिम निवाडा देईपर्यंत वाट पहावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.