सहआरोपी रोझी फेर्रोझला तीन दिवसांची कोठडी

0
119

>>रक्ताने माखलेली चादर जप्त; बाबूश बलात्कार प्रकरण
सांताक्रुझचे आमदार बाबूश मोन्सेर्रात यांच्या विरोधातील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील पीडित युवतीचा सौदा केल्याचा आरोप असलेली संशयित आरोपी रोझी फेर्रोझ या महिलेला न्यायालयाने काल तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. दरम्यान, गुन्हा अन्वेषण पोलिसांनी या प्रकरणी सबळ पुरावे गोळा करण्यास कंबर कसली असून काल रक्ताने माखलेली चादर पोलिसांनी जप्त केली आहे.

बाबूशची आज पुन्हा मनोविश्लेषण चाचणी
आज सोमवारी बाबूश मोन्सेर्रात यांची दुसरी मनोविश्लेषण चाचणी होणार आहे. अशा प्रकारची पहिली चाचणी शनिवारी झाली होती. मोन्सेर्रात यांच्या छातीवर पोलिसांना काही जखमा आढळून आलेल्या असून त्या त्यांनी स्वत: करून घेतलेल्या असल्याचे पोलिसांना आढळून आल्यानंतर त्यांची मनोविश्लेषण चाचणी घेण्यात आली होती. आज अशाच स्वरुपाची चाचणी दुसर्‍यांदा करण्यात येणार असून त्यासाठी त्यांना बांबोळी येथील मनोरुग्णालयात नेण्यात येणार आहे. त्यांच्या आमदार पत्नी जेनिफर मोन्सेर्रात यांच्या हजेरीत त्यांची ही चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीद्वारे पोलीस मोन्सेर्रात यांची मानसिक व लैंगीक वर्तणूक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. मोन्सेर्रात यांच्या छातीवर ज्या जखमा आहेत त्या त्यांना कशा झाल्या, त्या त्यांनी स्वत:च करून घेतलेल्या आहेत की झटापटीत झालेल्या आहेत हे अद्याप पोलिसांना कळू शकलेले नाही.

या चादरीवर रक्ताचे डाग असून ते पीडित मुलीच्या रक्ताचे आहेत की नाही हे स्पष्ट करण्यासाठी सदर चादर फोरेन्सिक लेबोरेटरीमध्ये पाठवण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ही चादर या बलात्कार प्रकरणातील एक महत्त्वाचा दुवा ठरणार असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. प्रमुख संशयित आरोपी बाबूश व पीडित युवतीच्या आईच्या पोलीस कोठडीचा तीन दिवसांचा रिमांड आज संपत असल्याने रिमांडात वाढ करण्यासाठी त्यांना आज बाल न्यायालयात उभे करण्यात येणार आहे.
मोबाईल सापडला
अल्पवयीन पीडित युवतीचा सौदा केल्याचा आरोप असलेल्या रोझी फेर्रोस या महिलेला पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. काल चौकशीदरम्यान पीडित युवतीला गेल्या तीन वर्षांपासून ओळखत असल्याचे पोलिसांना दिलेल्या जबानीत तिने सांगितले आहे. रोझीने पीडित युवतीला फोन व सीम कार्डही घेऊन दिले होते. मात्र, पीडित युवती व तिच्या आईचे भांडण झाल्याने दिलेला फोन परत घेतल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्या फोनमधील सिमकार्ड काढून तुकडे तुकडे केल्याची माहिती तिने पोलिसांना दिली आहे. सदर फोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. फोनमधील डेटा पोलिसांच्या हाती लागला असून तो अधिक चौकशीसाठी पाठविण्यात येणार आहे.
पौरुषत्त्वाची चाचणी
बाबुश मोन्सेर्रात यांना विविध वैद्यकीय चाचण्यांना सामोरे जावे लागत असून शुक्रवारी त्यांची पौरुषत्वाची चाचणी घेण्यात आली. मात्र, त्यात काही त्रुटी राहून गेल्याने आज पुन्हा एकदा त्यांची पौरुषत्त्वाची चाचणी घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पीडित युवतीचे दोन जन्मदाखले
पीडित अल्पवयीन युवतीचे वय अजून पोलिसांना कळलेले नाही. तिचे दोन जन्मदाखले सापडले असल्याने पोलीसही बुचकळ्यात सापडले आहेत. एका जन्मदाखल्यावर १९९९ साल तर दुसर्‍या जन्मदाखल्यावर २००० साल दाखविण्यात आले आहेत. पोलीस जन्मदाखल्यांबाबत कसून चौकशी करीत आहेत. पीडित युवतीचे वय किती हे कळण्यासाठी वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी सदर युवतीला आज वैद्यकीय तपासणीसाठी इस्पितळात नेण्याची शक्यता आहे. वैद्यकीय तपासणीनंतर नक्की वय किती हे गूढ उकलण्यास मदत होणार आहे.