(योगसाधना- 596, अंतरंगयोग- 181)
- डॉ. सीताकांत घाणेकर
आधीच मानवी जीवनाचा समय कमी आहे. त्याचा सदुपयोग करायला हवा. शक्यतो सत्कर्मे करायला हवीत, तेव्हाच आपले भाग्य चांगले होईल. नाहीतर या जन्मात व पुढील अनेक जन्मांत त्याचे दुष्परिणाम दिसतील. काही विविध संकटांच्या रूपाने तर काही रोगराईच्या रूपाने…
विश्वात करोडो मानव आहेत. प्रत्येकाच्या अनेक सवयी व त्यादेखील वेगवेगळ्या. मग ते एकाच घरात राहणारे जवळचे नातेवाईक असले तरी. पालक व मुले, भाऊ-भाऊ, भाऊ-बहिणी, बहिणी-बहिणी, आजी, आजोबा… स्त्रिया दुसऱ्या कुटुंबातून लग्न करून नवऱ्याच्या घरी येतात; पण तिच्या माहेरच्या सवयी वेगळ्या असू शकतात.
सवयी विविध संस्कारांवर अवलंबून असतात. मुख्यत्वे अनेक संस्कार पूर्वीच्या अनेक जन्मांचे, या जन्माचे, समाजाचे… सर्व वेगवेगळे. फक्त आत्म्याचे मूळ संस्कार समान असतात. पवित्रता, ज्ञान, सत्य, प्रेम, शांती, सुख, शक्ती- हे सप्तसंस्कार परमेश्वराकडून सर्वांना सारखेच असतात. पण दर जन्मात आत्म्यावर परिस्थितीप्रमाणे नवनवे चांगले-वाईट संस्कार होतच राहतात. त्यामुळे प्रत्येकाच्या सवयीदेखील विविध असतात- एकसमान नाहीत.
उदा. लवकर झोपणे- लवकर उठणे. त्याविरुद्ध उशिरा झोपणे- उशिरा उठणे. मोठ्याने बोलणे- हळू बोलणे. सर्व कामे व्यवस्थित अथवा अव्यवस्थित. हे झाले साधे संस्कार. त्यानंतर जरा मोठे संस्कार. नकारात्मकता ः काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू. अहंकार, त्याबरोबर द्वेष, सूडबुद्धी, स्वार्थ… अगदी वरच्या टोकावर. सकारात्मकता ः प्रेम, दया, क्षमा, मिळून-मिसळून वागणे. तसेच काही खोटे बोलणे- सत्य बोलणे, लाचलुचपत करणे, फसवणे वगैरे…
ही काही उदाहरणे आहेत. यादी फार मोठी आहे. सर्वांना माहीत आहे म्हणून उजळणीची गरज नाही. पण एक गोष्ट नक्की व ती म्हणजे एकदा सवय लागली की ती बदलणे, सोडणे अत्यंत कठीण होऊन जाते. अधिकतर वाईट सवयी. याउलट चांगल्या सवयी लावणे कठीण असते. म्हणून बालपणातच चांगल्या सवयी लावणे आवश्यक आहे. सुरुवातीलाच नैतिक शिक्षणावर भर दिला तर ते जास्त परिणामकारक ठरते. त्यामुळे आधी घरी, तद्नंतर शाळेत व समाजात योग्य संस्कारांवर सूक्ष्म नजर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासंबंधी लहानपणी काही गोष्टी-कथा आम्हाला सांगत असत.
एक मुलगा होता. त्याला वाईट सवयी बालपणापासूनच जडलेल्या होत्या. पालकांनी, शिक्षकांनी, नातेवाइकांनी सर्वतोपरी समजावून सांगितले, काहीवेळा शिक्षादेखील केली. पण तो सुधारण्याचे लक्षण दिसेना. शेवटी पालकांनी त्याला एका महापुरुषाकडे न्यायचे ठरवले.
त्या महापुरुषाने सर्व माहिती करून घेतली. त्यावर विचार केला आणि ते त्याला डोंगरावर घेऊन गेले. तिथे लहान-मोठी झाडे-रोपटी होती. त्याने त्या मुलाला एक लहान रोपटे मुळापासून उपटायला सांगितले. त्याने ते सहज केले. त्यानंतर थोडे मोठे दाखवले. तेदेखील त्याने थोडी जास्त शक्ती लावून उपटले. असे करीत करीत ते एका मोठा वृक्षाजवळ आले. प्रयत्न करूनदेखील तो वृक्ष हलेना, कारण त्याची पाळेमुळे खोल गेली होती.
त्या महापुरुषाने त्याला प्रेमाने समजावले- “बाळा, तुझ्या वाईट सवयीदेखील अशाच आहेत. त्या सवयी मूळ धरण्याच्या आधीच म्हणजे वाईट संस्कारात परिवर्तन होण्याआधीच बंद करायच्या असतात. त्याचबरोबर चांगल्या सवयी लावायच्या असतात. तुझ्या संस्कारांप्रमाणे व सवयीप्रमाणे तुझे जीवन घडेल.”
पूर्वीची ही पद्धत होती- कथा सांगणे, उदाहरणे देणे… त्यामुळे बालमनावर परिणाम लवकर होतो. जसे या मुलाच्या बाबतीत घडले. त्याला पटले की सवयी कशा लावायच्या ते व कशा सोडायच्या तेदेखील.
आजदेखील विज्ञानाच्या व भौतिकतेच्या क्षेत्रात तशाच पद्धती आहेत- तत्त्वज्ञान, सिद्धांत, प्रात्यक्षिक… दुर्भाग्याने अध्यात्माचा अभ्यास आवश्यक तेवढा केला जात नाही. उलट अधात्मशास्त्र अत्यंत गरजेचे असूनदेखील त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तथाकथित विद्वान व सुशिक्षित त्यावर टीका करताना दिसतात. अपवाद अवश्य आहेत. समाजात चौफेर नजर फिरवली तर अनेक व्यक्तींच्या वाईट सवयी दृष्टिपथात येतात आणि त्यांबद्दल विविध प्रतिक्रिया असतात- ‘मला काय लागून गेले आहे? त्याचे तो बघून घेईल’ वगैरे. काहीजण तर एकत्र भेटले तर अशा विषयांवर गप्पागोष्टी (गप्पाटप्पा- गॉसीप) करताना दिसतात. त्या व्यक्तीच्या अनुपस्थितीत त्यांना पुष्कळ आनंद होतो. मग अशा कथा पुढे पुढे सरकतात व समाजात पसरततात. केव्हा केव्हा काहीजण पदरचा मिठमसाला त्यामध्ये मिसळतात. कुठल्याही बैठकीमध्ये हे दृश्य बघायला मिळते. मग ते भेटणे काहीही कारणामुळे असू दे- सहल, सिनेमा, नाटक, कीर्तन, प्रवचन, सण, उत्सव, लग्न, मुंज… अनेकांना अशा गोष्टींमध्ये अत्यंत आनंद होतो. खरे म्हणजे हा वेळेचा नाश आहे.
एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आधीच मानवी जीवनाचा समय कमी आहे. त्याचा सदुपयोग करायला हवा. शक्यतो सत्कर्मे करायला हवीत, तेव्हाच आपले भाग्य चांगले होईल. नाहीतर या जन्मात व पुढील अनेक जन्मांत त्याचे दुष्परिणाम दिसतील. काही विविध संकटांच्या रूपाने तर काही रोगराईच्या रूपाने.
समयाबद्दल एक चांगली म्हण आठवते- ‘आपल्याकडे वेळ असताना सवयी बदलायला हव्यात, नाहीतर अशी वेळ येते की सवयी वेळेला बदलतात!’ तेव्हा आपण म्हणतो की माझी वेळ आता वाईट आहे. माझी वेळ आता उपयुक्त नाही.
समाजात सज्जन व्यक्तीदेखील अनेक आहेत. त्यांना अशा वाईट सवयीच्या माणसांची दया येते. ते त्यांना समजावतात- अगदी प्रेमाने. काहीजण त्यांचे ऐकतात. त्यांना ते पटते व ते परिवर्तन करतात. त्यामुळे त्यांचे प्रारब्ध, भाग्य बदलू शकते.
काही प्रचलित उदाहरणे म्हणजे-
- महर्षी नारदांमुळे वाल्याचा महर्षी वाल्मिकी झाला.
- भगवान बुद्धामुळे अंगुलीमल मोठा संत झाला.
आपल्या आसपासदेखील अनेक क्षेत्रांत अशी उदाहरणे दिसतात. काही व्यक्ती अशाही असतात की जर तिला सांगितले की दुसरा वाईट असला, वागला तरी तुम्ही बदला. तुमचे भाग्य बदलेल. काहींना हे विचार पटत नाहीत. ते म्हणतात, ‘मीच का बदलू?’
केव्हा केव्हा सांगणाऱ्या व्यक्तीचा प्रभाव दुसऱ्यावर पडत नाही. शास्त्रकार यावर अनेक कारणे सांगतात- वय, अधिकार, स्थान… पण यांबरोबर आणखी एक कारण म्हणजे, ते फक्त दुसऱ्यांना सांगतात, उपदेश करतात; स्वतः करत नाहीत. ज्यावेळी ते स्वतः तसे करतील त्यावेळी त्यांची आत्मशक्ती वाढते व प्रभाव पडण्याची शक्यता वाढते. यासंदर्भात बालपणातील एक कथा-
एका गावात एक लहान मुलगा गूळ खात होता. आई त्याला ओरडायची. मग तो चोरून खात असे अथवा शेजाऱ्याकडून मागून खात असे. आईच्या सांगण्याचा काहीदेखील परिणाम त्याच्यावर होत नसे. तेव्हा काहीनी आईला सांगितले की, शेजारच्या गावात संत एकनाथ राहतात. त्यांनी सांगितले तर तो ऐकेल.
आई संत एकनाथांकडे गेली. त्यांनी सगळी गोष्ट ऐकली व म्हणाले- ‘तुम्ही आठ दिवसांनी या, मी त्याला समजावतो!’ आठ दिवसांनी ती दोघे संताकडे परत गेली. एकनाथांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला व म्हणाले, ‘बाळा, असा गूळ खाणे अगदी वाईट. तू बंद करशील ना?’ मुलगा ‘हो’ म्हणाला.
दोघं घरी आली. आईला संताचा राग आला. कारण अशी गोष्ट सांगण्यासाठी आठ दिवस वाट का बघितली? मला परत जायला किती त्रास झाला! हे संत वगैरे काही नाही. ज्यांनी तिला एकनाथांकडे पाठवले त्यालादेखील ती तसे बोलली.
आश्चर्य म्हणजे मुलाने गूळ खायचे बंद केले. आता तिला पश्चात्ताप झाला. कारण एका संताला दोष दिला होता. पण मूळ प्रश्न सुटेना- ‘पहिल्यावेळी का सांगितले नाही?’ म्हणून शंकानिरसनासाठी ती परत गेली. त्यांची क्षमा मागितली व शंका सांगितली. एकनाथ हसले व म्हणाले, ‘काय सांगू? मला गूळ खायची सवय होती. माझ्या ते लक्षातच आले नाही. मग मी त्याला कसे सांगणार? मी ठरवले की आठ दिवसांत मी बंद करीन, मग त्याला सांगेन. तुम्हाला दोन वेळा यायचे त्रास झाले. क्षमा करा!’
थोर संत व आपण- फरक हाच! आम्ही फक्त उपदेश करतो. स्वतःची वागणूक, स्वतःच्या सवयी बघत नाही. इतरांचे छोटेसे अवगुण आम्हाला पर्वताएवढे दिसतात.
सारांश ः आपल्या वाईट सवयी बदलण्यासाठी आधी इच्छा ठेवायची. योगसाधना करून आत्मशक्ती वाढवायची. मग परिवर्तन करणे सोपे जाते. प्रत्येकाला प्रयत्न करायला हरकत नाही.
(मूळ संदर्भ ः प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय व इतर साहित्य)