संपूर्ण जगामध्ये गोव्याची ओळख आजवर येथील धार्मिक सलोखा, शांती आणि सौहार्द्र यासाठी आहे. मात्र, गेल्या काही काळापासून राज्यातील ह्या सलोख्याला आणि शांततेला सुरुंग लावण्याचे पद्धतशीर प्रयत्न काही उपद्रवी घटकांकडून होत असल्याचे वारंवार प्रत्ययास येत आहे. त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वेठीस धरले आहे. कळंगुट येथील शिवपुतळ्याचा वाद, काही संबंधच नसताना एका चर्चच्या फादरने शिवरायांबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य, करासवाडा येथे नुकतीच झालेली शिवपुतळ्याची मोडतोड, या सगळ्या घटना पाहिल्या तर राज्यात सध्या काय चालले आहे याचा अंदाज येतो. काही वर्षांपूर्वी राज्यात विशेषतः दक्षिण गोव्यात अचानक क्रॉसच्या मोडतोडीचे सत्र सुरू झाले होते आणि त्यातून राज्यातील सलोखा धोक्यात येतो की काय असे चित्र निर्माण झाले होते. पोलिसांनी त्या प्रकरणाचा कसून तपास केला आणि शेवटी एका ख्रिस्ती माथेफिरू टॅक्सीचालकाचाच त्या सगळ्या प्रकरणांत हात असल्याचे समोर आले. त्यामागचे कारणही वैयक्तिक होते. धार्मिक तणाव निर्माण करण्याचा त्यात हेतू नव्हता असे पुढे स्पष्ट झाले. यावेळीही पोलिसांनी करासवाडा शिवपुतळा मोडतोड प्रकरण गांभीर्याने घेतले आणि विशेष तपास पथकाने रातोरात तिघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशीही चालवली आहे. या प्रकरणामागे नेमके कोण होते हे समोर आलेले असल्याने, आता त्यामागचा उद्देश नेमका काय होता हेही लवकरच स्पष्ट होईल अशी आशा आहे. करासवाडा प्रकरणात एक गोष्ट लक्षवेधी ठरली ती म्हणजे ह्या शिवपुतळ्याची मोडतोड काय झाली, राज्याचे मंत्री, खासदार, आमदार तेथे नेतेगिरी करायला तात्काळ रवाना झाले. अर्थात, त्यामागे त्यांचे शिवप्रेम कमी आणि राजकीय हतबलताच अधिक दिसली. एक वाचाळ मंत्रिमहोदय तर ह्या मोडतोडीमागे कोण आहे आणि त्याचा त्यामागचा हेतू काय हे समोर येण्याआधी स्वतःच निष्कर्ष काढून मोकळे झाले आणि ‘हिंमत असेल तर समोर या’ असे आव्हान देऊ लागले. हा उथळपणा आणि अविवेक राजकीय उच्चपदस्थांना तरी मुळीच शोभादायक नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक भारतीयासाठी आराध्यदैवत आहे आणि असायला हवे, परंतु हे प्रेम सच्चे हवे. ते राजकीय उमाळे असता कामा नयेत. वास्तविक, छत्रपती शिवाजी महाराजांप्रती प्रेम आणि आस्था राष्ट्रीय वृत्तीच्या गोमंतकीयांच्या रगारगांत आहे. गोवा मुक्तीसाठी शिवाजी महाराज आणि संभाजीराजांनी सातत्याने केलेले प्रयत्न सर्वविदित आहेत. संभाजीराजे तर पोर्तुगिजांच्या तत्कालीन राजधानीच्या, जुन्या गोव्याच्या वेशीवर पोहोचले होते आणि जुवे बेटावरून तिकडे पळ काढणाऱ्या शत्रूला त्यांनी कापून काढले होते. बार्देश, डिचोली, फोंडा अशी ठिकाणे शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहेत. गोव्याच्या नव्या काबिजादी पोर्तुगिजांच्या ताब्यात यायला अठरावे शतक उजाडावे लागले त्याचे कारणच मुळी मराठी सत्तेचा त्यांच्यावर असलेला धाक हे होते, परंतु काही स्वयंघोषित विद्वानांना हे कबूल करणे गैरसोयीचे वाटते. आम गोमंतकीय जनतेच्या मनामध्ये मात्र शिवाजीराजांबद्दल, संभाजीराजांबद्दल नितांत प्रेम आणि आदर आहे. गोव्याच्या खेडापाड्यांतून उत्सवी रंगभूमीवर ऐतिहासिक नाटके साजरी होत असत त्यातूनही हे प्रेम वाढीस लागले. गोव्यातील पहिली शिवजयंती सार्वजनिकरीत्या साजरी करायला अनेक दशकांपूर्वी कुडचड्यात सुरुवात झाली होती. फर्मागुढीत शशिकलाताई काकोडकर यांच्या सरकारने एक अश्वारूढ शिवपुतळा आणून बसवला व नंतर तेथे पर्यटकांचे आकर्षणस्थळ बनावे म्हणून एक किल्ला बांधला. मग तेथे दरवर्षी शिवजयंती सरकारी पातळीवर उत्साहात साजरी होऊ लागली व तो सोहळा आजही सुरू आहे. डिचोली, म्हापसा अशा अनेक शहरांत स्थानिक नागरिक मोठ्या प्रेमाने शिवजयंती साजरी करतात. डिचोलीतही नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने शिवपुतळा उभारला होता. नंतर तो हटवण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा त्याला विरोध झाला व आंदोलनही झाले होते. नंतर समोरच्या मैदानाचा विकास करून त्याचे छत्रपती शिवाजी महाराज मैदान असे नामकरण करण्यात आले. शिवजयंती सोहळा गोमंतकीय नागरिकही दरवर्षी उत्साहात साजरा करीत आलेले आहेत, परंतु त्याला त्यांनी कधी सवंगपणा येऊ दिला नव्हता. अलीकडे मात्र काहींच्या शिवप्रेमाला अचानक फारच भरते आलेले दिसते आहे. अनेक भागांत नव्याने व मोठ्या प्रमाणावरील शिवजयंती कार्यक्रम, मिरवणुका सुरू झाल्या आहेत ही स्वागतार्ह बाब आहे, परंतु जनतेच्या मनातील सच्च्या शिवप्रेमाला धार्मिक तणाव निर्माण करणारे वळण दिले जाऊ नये व त्यातून काही मतलबी घटकांना आपली राजकीय पोळी भाजता येऊ एवढीच या घडीस सर्वांची अपेक्षा आहे.