गोव्यामध्ये कोणीही दुसऱ्याच्या धर्माविषयी अनुदार उद्गार काढले, तर बोलणाऱ्याचा धर्म न बघता कडक कारवाई करणार असा खणखणीत इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या इशाऱ्याचे आम्ही स्वागत करतो. अन्यथा आजकाल कोणीही उठावे आणि एकमेकांच्या धर्माविषयी काहीही बरळावे असा प्रकार चालला आहे. काहीही संबंध नसताना, कारण नसताना दुसऱ्याच्या धर्माविषयी काहीतरी अचकट विचकट बोलण्याचे – लिहिण्याचे बरेच प्रकार गेल्या काही दिवसांत झाले. दक्षिण भारतामध्ये तर सनातन हिंदू धर्माविषयी उदयनिधी स्टॅलीनने शेलकी भाषा वापरली. अर्थात, त्यामागे आपल्या पेरियारवादी दाक्षिणात्य मतपेढीला खूष करण्याचाच प्रयत्न अधिक होता. गोव्यामध्ये सर्व धर्मांमध्ये आजवर सुसंवाद राहिला आहे. परंतु गोव्यातही गेल्या वर्षभरात धार्मिक तणाव उत्पन्न करणारे काही प्रसंग घडले. विशेषतः फादर बोलमॅक्स परेरा याने छत्रपती शिवाजी महाराजांवर अकारण शिंतोडे उडवले आणि हिंदू समाजाचा रोष ओढवून घेतला. आता ताळगावच्या एका फादरने हिंदू देवाला ‘खोटा देव’ ठरवून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. शेर्मांव देण्याच्या नादात कुठल्याकुठे वाहावत जाणे ही हल्ली फॅशनच झाली असावी अशा रीतीने वारंवार ही कुरापत काढली जाते आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर नजर ठेवून राज्यामध्ये धार्मिक असंतोष व त्याच्या आधारे ध्रुवीकरण करण्याच्या एका व्यापक षड्यंत्राचा हा भाग तर नव्हे ना याच्या खोलात जाण्याची म्हणूनच गरज निर्माण झाली आहे. चर्चच्या ‘नवसोरणी’ ह्या मुखपत्रामध्ये काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या लेखाकडे मागे आम्ही एका अग्रलेखात लक्ष वेधले होते. ‘मणिपूर झाले, आता पुढची पाळी गोव्याची असेल’ अशी भीती ख्रिस्ती समाजाला घालायचा पद्धतशीर प्रयत्न त्या मुखपत्रातील लेखात करण्यात आला होता. ‘धिंड काढली जाईल, तयार रहा, आपले कपडे वाचवा’, ‘चर्चेस पाडल्या जातील, धर्मगुरूंना बडवले जाईल, कुटुंबाची काळजी घ्या’ अशी चिथावणीखोर भाषा त्यात वापरली गेली. सुदैवाने आपला विवेक शाबूत असलेल्या गोमंतकीय ख्रिस्ती समाजाने त्याकडे दुर्लक्षच केले. फादर बोलमॅक्स यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर शिंतोडे उडवण्याचा उद्धटपणा केला. तेव्हाही ख्रिस्ती समाजातील विचारशील व्यक्तींनी त्या विधानापासून फारकत घेतली. आम ख्रिस्ती समाजानेही त्या विधानाकडे दुर्लक्ष करणेच पसंत केले. आता ताळगावच्या प्रकरणातही आम ख्रिस्ती समाजाला त्या विधानाशी काही देणेघेणे नाही. तो आपल्या दैनंदिन जीवनसंघर्षात व्यग्र आहे आणि असल्या चिथावणीखोर वक्तव्यांनी माथी भडकावून घेण्याएवढा तो सवंग बनलेला नाही. काही ख्रिस्ती धर्मगुरूंच्या तोंडून अशा प्रकारे विष ओकले जात असताना त्याला प्रत्युत्तर म्हणून तशाच विषारी आणि विखारी भाषेचा वापर करायचा प्रयत्न हिंदू समाजामधूनही होताना दिसतो. शेवटी ही प्रवृत्तीही त्याच जातकुळीची आहे. त्यामुळे ‘दुसऱ्याचे ते कार्टे आणि आपला तो बाब्या’ असा आपपर भाव न बाळगता सरकारने अशा उठवळ प्रवृत्तीला एकाच मापात जोखले पाहिजे आणि वेळीच कारवाई केली पाहिजे. अन्यथा अशा संवेदनशील विषयांत काट्याचा नायटा व्हायला वेळ लागत नाही. मुळात सरकारचा घटक असलेल्या मंत्र्यांनीही अशा विषयांत जबाबदारीने वागणे बोलणे अपेक्षित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची करासवाड्यात विटंबना झाली तेव्हा एका मंत्र्याने फार बेताल वक्तव्ये तेथे केलेली होती. हा प्रकारही तेवढाच आक्षेपार्ह आहे. विशेषतः मंत्रिपदावरील जबाबदार व्यक्तीकडून अशा प्रकारच्या उठवळ विधानांची मुळीच अपेक्षा नव्हती. मतांच्या हिशेबासाठी अशा प्रकारची धार्मिक तणावाची भुतावळ उकरून काढली जाते, तेव्हा तिचा फारतर अल्पकालीक फायदा राजकारण्यांना मिळतो, परंतु त्यातून समाजाचे जे नुकसान होते ते चिरकालीक असते. समाजामध्ये, जातीधर्मांमध्ये उभी फूट पडते तेव्हा ती पुन्हा सांधून यायला युगे लोटावी लागतात एवढी ती खोलवर काळीज चिरत गेलेली असते. गोव्यामध्ये आजवर अनेक विवाद निर्माण झाले, काही तर जाणूनबुजून निर्माण करण्याचे प्रयत्न झाले, परंतु गोमंतकीय समाजाने असल्या उठवळ प्रवृत्तीला आजतागायत भीक घातलेली नाही. हिंदू आणि ख्रिस्ती समाजामध्ये एकमेकांविषयीचा तेवढा विश्वास अजून शिल्लक आहे. याचे मुख्य कारण गोमंतकीय ख्रिस्ती समाजाला गोव्याच्या धर्मांतरपूर्व इतिहासाचा अद्याप विसर पडलेला नाही. त्यामुळेच आपल्या मुळांविषयीची आस्था आणि आपुलकी त्याच्या ह्रदयात आहे. तिला आणि या बंधुभावाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न जर कोणी सातत्याने करू पाहात असेल तर सरकारने खरोखरच मुक्याची भूमिका घेऊ नये. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी वेळीच उपद्रवी घटकाची खोड मोडावी हे उत्तम.