>> श्रीलंकेतील आर्थिक संकटात अधिक भर
श्रीलंकेतील भीषण आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या सरकारमधील सर्व मंत्र्यांनी रविवारी रात्री उशिरा सामूहिक राजीनामे दिले. त्यात पंतप्रधान राजपक्षे यांचा मुलगा आणि क्रीडा मंत्री नमल राजपक्षे यांचाही समावेश आहे. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. दरम्यान, महिंदा राजपक्षे यांनी अद्याप आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही.
श्रीलंका आतापर्यंतच्या सर्वात भीषण आर्थिक संकटाला सामोरे जात असून, हे संकट दिवसेंदिवस गहिरे होत चालले आहे. श्रीलंका सरकारमधील सर्वच्या सर्व २६ मंत्र्यांनी आपला राजीनामा दिला आहे. श्रीलंकेचे शिक्षणमंत्री दिनेश गुणवर्धने यांनी देशाच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रविवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर राजीनामा देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, लवकरच नवीन मंत्रिमंडळाची स्थापना केली जाणार आहे.
६०० नागरिक अटकेत
३६ तासांच्या संचारबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल आणि सरकारविरोधी मेळावा आयोजित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल देशाच्या पश्चिम प्रांतात रविवारी ६०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली.