>> कोविड तज्ज्ञ समितीची शिफारस, डॉ. शेखर साळकर यांची माहिती
कोविड तज्ज्ञ समितीच्या बैठकीत राज्यातील थिएटर्स, कॅसिनो, व्यायामशाळा आदी व्यावसायिक आस्थापने १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. शेखर साळकर यांनी तज्ज्ञ समितीच्या बैठकीनंतर बोलताना काल दिली.
राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याने ५० टक्के क्षमतेने सुरू असलेली विविध व्यावसायिक आस्थापने कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करून १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास तज्ज्ञ समितीने हिरवा कंदील दाखवला आहे. गोमेकॉमधील कोविड रुग्णांसाठीचा सुरू करण्यात आलेला सुपर स्पेशालिटी ब्लॉकमधील खास विभाग बंद करण्यात आला असून केवळ पाच कोविडबाधित सरकारी इस्पितळात उपचार घेत आहेत, अशी माहिती डॉ. साळकर यांनी दिली.
व्यावसायिक आस्थापनांनी मास्क, सॅनिटायझर्स आदी कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. व्यायामशाळेत एकाच वेळी जास्त गर्दी होऊ नये म्हणून सभासदांसाठी वेळेचे नियोजन करावे. जलतरण तलाव, स्पा हे सुद्धा १०० टक्के क्षमतेने सुरू करावेत, अशी शिफारस करण्यात आली आहे.
विद्यालयांनी घेतलेल्या संमतिपत्राची
शिक्षण खात्याने घेतली दखल
राज्यातील विद्यालयाचे वर्ग सुरू करण्यात आल्यानंतर काही विद्यालय व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून सक्तीने संमतिपत्र घेण्याच्या प्रकाराची शिक्षण खात्याने गंभीर दखल घेतली आहे, अशी माहिती शिक्षण संचालक भूषण सावईकर यांनी काल दिली.
शिक्षण खात्याने यासंदर्भात एक प्रस्ताव तयार करून सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. त्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर आवश्यक आदेश जारी केला जाणार आहे, असेही शिक्षण संचालक सावईकर यांनी सांगितले.
राज्यात कोविडच्या तिसर्या लाटेत नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याने राज्यातील विद्यालयाचे पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील काही विद्यालय व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतिपत्र देण्याची सूचना करण्यात आली आहे. विद्यालयात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला विद्यालय व्यवस्थापनाला जबाबदार धरणार नाही, अशा आशयाचे संमतिपत्र देण्याची सूचना करण्यात आली आहे. याबाबत काही पालकांनी शिक्षण खात्याकडे तक्रार केली आहे. शिक्षण खात्याने या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. शिक्षण खात्याने नवीन सूचनांबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे.
विद्यालयेही पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता
विद्यालयाचे वर्गसुध्दा १०० टक्के क्षमतेने सुरू केले जाऊ शकतात. कोविड तज्ज्ञ समितीच्या शिफारशी कृती दलाच्या बैठकीत ठेवण्यात येणार असून त्यानंतर सरकारकडून पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असेही डॉ. साळकर यांनी सांगितले.