मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार असंवेदनशील बनले आहे. सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. कॉंग्रेस पक्षांकडून जनतेच्या हिताचे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. परंतु, सरकारकडून या प्रश्नांची दखल घेतली जात नाही. खाण बंदी, म्हादई, बेरोजगारी, पर्यटनाला उतरती कळा, आर्थिक घसरण व इतर विषयावर भाजप सरकार अपयशी ठरल्याने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल केली.
राज्यात कांद्यांच्या तुटवड्याप्रमाणे आगामी दोन महिन्यांत राज्यात नारळाचा तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. कांद्यांच्या तुटवड्यामुळे दरात मोठी वाढ झाली. त्याच प्रमाणात नारळाच्या दरात वाढ होऊन नागरिकांना महागाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात नारळाचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून सरकारने आत्ताच आवश्यक उपाय योजना हाती घेण्याची गरज आहे, असे चोडणकर यांनी सांगितले.
राज्य सरकार भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला. कॉंग्रेस पक्षाने तिसर्या मांडवी पुलाच्या विद्युत कामात ४५ कोटीचा घोटाळ्याचा आरोप केला होता. फातोर्डा मडगाव येथे स्टेडियमच्या दुरुस्ती कामात ६१ कोटी रुपयांचा आरोप केला होता. या प्रकरणाची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. नगरनियोजन खात्याच्या १६ ब कलमाखाली बेकायदा व्यवहार, सेझ जमीन ताब्यात घेण्यासाठी जमीन मालकांना व्याज देण्याची कोणतीही तरतूद नसताना व्याज देण्यात आले आहे. डिसेंबर २०१९ मध्ये हणजूण येथे आयोजित संगीत महोत्सवातील तीन जणांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणाचा तपास मंदावला आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातील काही व्यक्ती तोतया मंत्री बनून सरकारी पाहुणचार, सुरक्षा रक्षक घेतल्याच्या प्रकरणामुळे राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे.
चोडणकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पं. नेहरूंबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याबाबत वक्तव्य करताना नेहरू यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा प्रथम अभ्यास करावा. गोवा उशिरा स्वातंत्र्य होण्याची कारणे नेहरूंनी आपल्या पुस्तकातून मांडलेली आहेत.