सर्वोत्तम देण्यासाठी शिक्षण उत्तम साधन : मुख्यमंत्री

0
104
साखळीत भरलेल्या आनंददायी बालशिक्षण या अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. बाजूस उपसभापती अनंत शेट, डॉ. प्रमोद सावंत, सुरेखा दीक्षित, अलका बियाणी, रामचंद्र गर्दे, डॉ. प्रकाश वझरीकर आणि मनोज सावईकर. (छाया : संतोष मळीक)

आनंददायी बालशिक्षण अधिवेशनाचा समारोप सर्वोत्तम ते देण्यासाठी आपल्याजवळ शिक्षण हे उत्तम साधन आहे. त्यामुळे बालवयात मुलांना देण्यात येणारे शिक्षण चांगल्या पध्दतीने देण्याचे कर्तव्य शिक्षकाला पार पाडायचे आहे. त्याचप्रमाणे पालकांनीही आपल्या मर्जीनुसार मुलांच्या डोक्यावर शिक्षणाचे ओझे देऊ नये. तसे झाल्यास मुलांचे भविष्य कालवंडण्याची भीती असते असे विचार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथे व्यक्त केले.गोमंतक बालशिक्षण परिषद, महाराष्ट्र बालशिक्षण परिषद राज भाषा संचालनालय (गोवा सरकार) आणि रवींद्र भवन साखळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अधिवेशन ‘आनंददायी बाल शिक्षण’ या संमेलनाच्या समारोप समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपसभापती अनंत शेट, आमदार डॉ. प्रमोद सावंत, राजभाषा संचालनालयाचे संचालक डॉ. प्रकाश वझरीकर, गोमंतक बालशिक्षण परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा दीक्षित, महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा अलका बियाणी, रमेश पानसे, रामचंद्र गर्दे आणि मनोज सावईकर उपस्थित होते. उपसभापती अनंत शेट यांनी आपल्या भाषणात सांगितले की बाल शिक्षण हे शास्त्रीय पध्दतीने होणे गरजेचे आहे. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष या नात्याने बोलताना डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की पालक हे पाल्याच्या शिक्षणाबरोबर आपल्या मनातील इच्छा पल्लवीत करण्याचा प्रयत्न करतात. तसे न करता मुलांच्या आवडीप्रमाणे त्याला शिक्षण द्यावे. त्याचप्रमाणे तीच आपली कायम ठेव आहे हे मानून त्यातच गुंतवणूक करावी. या ठेवीचा फायदा त्याला वृध्दापकाळी अवश्य मिळेल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्याध्यक्ष रामचंद्र गर्दे यांनी सर्वांचे स्वागत केले. सुरेखा दीक्षित यांनी दोन्ही परिषदेचा अहवाल सादर केला. यावोळी पूनम बुर्ये यांनी आपले अधिवेशनासंबंधीचे मनोगत व्यक्त केले. त्याआधी पहिल्या चर्चा सत्रात अलका बियाणी यांनी निसर्गातले शिक्षण मुलांच्या मनातील भीती घालवून जिज्ञासा जागृत करते असे मत मांडले. विविध अनुभवातून त्याचा आत्मविश्‍वास बळावतो. विविध कृतीतून अलगदपणे मूल शाळांच्या समीप जातात, असे त्या म्हणाल्या. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी गर्दे यांनी केले तर आभार मनोज सावईकर यांनी मानले.