>> बांगलादेश पहिल्या, तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानी; पहिल्या 50 प्रदूषित शहरांपैकी 42 शहरे भारतातील
जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारताच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंद झाल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणाच्या अहवालावरून समोर आले आहे. स्वीस एअर मॉनिटरिंग बॉडी आयक्यूएअरने हा सर्वे केला असून, त्यानुसार बांगलादेश आणि पाकिस्तानच्या पाठोपाठ भारत हा जगभरातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे. ‘वर्ल्ड एअर क्वॉलिटी रिपोर्ट 2023′ च्या निष्कर्षांनुसार 134 देशांच्या यादीत भारताचा प्रदूषित हवेच्या निकषांवर तिसरा क्रमांक लागतो. त्याशिवाय जगातील सर्वाधिक प्रदूषित पहिल्या 50 शहरांमध्ये एकट्या भारतातील 42 शहरांचा समावेश आहे.
जगभरातील विविध देशांमधल्या हवेचा दर्जा तपासण्यासाठी पीएम 2.5 चे प्रमाण हे मापक वापरण्यात आले होते. त्यानुसार भारतात प्रत्येक क्युबिक मीटर क्षेत्रात 54.4 माक्रोग्रॅम पीएम 2.5 चे केंद्रीकरण झाल्याचे निदर्शनास आले. बांगलादेशमध्ये हे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच 79.9 मायक्रोग्रॅम प्रतीक्युबिक मीटर तर त्यापाठोपाठ पाकिस्तानमध्ये हे प्रमाण 73.7 मायक्रोग्रॅम प्रतीक्युबिक मीटर इतके आढळून आले.
दुसरीकडे सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातल्या तब्बल 42 शहरांचा समावेश आहे. जगभरातील सर्वाधिक प्रदूषत शहर बिहारमधील बेगुसराय ठरले असून, त्यापाठोपाठ गुवाहाटी व दिल्ली या दोन शहरांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक लागतो.
2023 मध्ये बेगुसरायमध्ये प्रती क्युबिक मीटर पीएम 2.5 चे प्रमाण 118.9 मायक्रोग्रॅम इतके आढळून आले. गुवाहाटीमध्ये 2023 मध्ये तब्बल 105.4 मायक्रोग्रॅम प्रती क्युबिक मीटर इतके वाढल्याचे आढळून आले. दिल्लीत हेच प्रमाण याच काळात 92.7 मायक्रोग्रॅम प्रती क्युबिक मीटर इतके वाढले आहे.
भारतातील इतर प्रदूषित शहरे कोणती?
बेगुसराय, गुवाहाटी आणि दिल्लीव्यतिरिक्त ग्रेटर नोएडा (11), मुझफ्फरनगर (16), गुरगाव (17), अराह (18), दादरी (19), पाटणा (20), फरिदाबाद (25), नोएडा (26), मीरत (28), गाझियाबाद (35) आणि रोहतक (47) या शहरांचा या यादीत समावेश आहे.
कशी गोळा केली माहिती?
या सर्वेक्षणासाठी नेमकी माहिती कशी गोळा करण्यात आली, याबाबतही आयक्यूएअरकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या सर्वेक्षणासाठी 134 देशांमधील 7 हजार 812 ठिकाणी उभारण्यात आलेल्या तब्बल 30 हजार एअर स्टेशन्सच्या माध्यमातून माहिती गोळा करण्यात आली आहे.