अयोध्या नगरीमध्ये काल श्रीरामाच्या भव्यदिव्य मंदिराचे विधिवत भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. देशाचा सर्वोच्च नेता अयोध्येतील रामललापुढे यावेळी सकल साष्टांग दंडवत घालताना जगाने पाहिला. भारत हा संविधानानुसार धर्मनिरपेक्ष देश आहे, परंतु त्याचा अर्थ या भूमीची संस्कृती, तिचा वारसा, तिची परंपरा याप्रतीची आस्था, श्रद्धा यांच्याशी फारकत घेणे नव्हे असेच जणू पंतप्रधानांनी आपल्या या कृतीद्वारे सूचित केले आहे. या देशाचे सरकार आपल्या प्राचीन, पुरातन वारशाप्रती, राष्ट्रीय महापुरुषांप्रती आस्था राखणारे आहे हा भावच पंतप्रधानांच्या या सहजकृतीमधून व्यक्त झाला आहे असे म्हणायला हरकत नसावी. हा केवळ वैयक्तिक श्रद्धाभाव नव्हता, तर या देशाचा सर्वोच्च नेता प्रभू श्रीरामासारख्या आदर्श पुरुषाच्या चरणी शरणागत आहे हा भावही त्यातून व्यक्त होत होता.
शतकानुशतके ज्या क्षणाची वाट पाहिली, तो रामजन्मभूमी मुक्तीचा क्षण प्रत्यक्ष अनुभवत असल्याची, नव्हे, त्यामध्ये सक्रिय सहभागी असल्याची धन्यता पंतप्रधानांच्या भाषणातून व्यक्त झालीच, परंतु त्याहून त्यांनी रामकथेचा धागा राष्ट्रीय नव्हे, वैश्विक एकात्मतेशी ज्या प्रकारे जोडला ते पाहण्यासारखे होते. इंडोनेशिया, मलेशियासारख्या मुस्लीमबहुल राष्ट्रांमध्ये देखील राम हे कसे वंदनीय दैवत आहे, कंबोडियापासून थायलंडपर्यंत आणि नेपाळपासून श्रीलंकेपर्यंत त्याचा प्रभाव कसा आहे ते पंतप्रधानांनी सांगितले आणि भारतीय उपखंडामध्ये प्रांतोप्रांती त्याची विविध पंथियांकडून कशी सगुण – निर्गुण रुपांमध्ये भक्ती होत राहिली आहे त्याचेही विस्तृत विवेचन केले. एका परीने या प्राचीन अवतारी पुरुषाच्या भक्तीभावनेतून अवघा देश कसा जोडलेला आहे त्यावर त्यांनी नेमकेपणाने आणि विस्ताराने बोट ठेवले.
रामजन्मभूमीचे स्वप्न साकारत असताना ते काही सहजासहजी साकारलेले नाही. त्यासाठी शतकानुशतके संघर्ष करावा लागला आहे, शेकडो माणसांचा बळी गेला आहे. प्रदीर्घ न्यायालयीन लढा द्यावा लागला आहे, परंतु हे सगळे असूनही त्या गतइतिहासासंबंधी कोणतीही कटुता न ठेवता देशाला एका धाग्यामध्ये जोडण्याच्या दृष्टीने या मंदिरस्थापनेकडे पाहता येण्यासारखे आहे. कालच्या आमच्या अग्रलेखामधून त्याच दृष्टीने आम्ही विवेचन केले होते. हे राममंदिर हे कर्मकांडांसाठी नाही, तर आपल्या नित्यकर्मामध्ये प्रभू श्रीरामांचा आदर्श उतरवण्याची प्रेरणा देण्यासाठी असायला हवे. मर्यादापुरुषोत्तम, सत्यवचनी श्रीरामाची चरितकथा युगानुयुगे भारतीय समाजमानस गात राहिले. अगदी इहलोकाची यात्रा संपवतानादेखील त्याच्याच नामाशी तल्लीन होत राहिले. रामनामाचा हा महिमा या देशाच्या संतमहंतांनी जसा गायिला, तसाच आधुनिक भारतातील युगपुरुष महात्मा गांधींनी देखील आपल्या नित्य दिनक्रमामधून गायिलेला आपल्याला दिसेल. हे राममंदिर हे केवळ एका धर्माचे मंदिर आता राहिलेले नाही. ते भारतीय अस्मितेचे, राष्ट्रीय स्वाभिमानाचे प्रतीक बनले आहे. आजवर या मंदिरावर अनेक घाले आले. अनेकदा ते उद्ध्वस्त झाले आणि पुन्हा पुन्हा उभे राहिले. यापुढे त्याच्यावर घाला पडणार नाही असा जो दृढ विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला, तो खूप काही सांगून जाणारा आहे.
भारतीय जनता पक्षासाठी या राममंदिराची उभारणी हा वचनपूर्तीचा क्षण असल्याने त्याचे राजकीय श्रेय उपटण्याचा मोह त्या पक्षाला जरूर होईल, परंतु राम आणि त्याचे हे मंदिर हा क्षुद्र पक्षीय राजकारणापलीकडचा विषय आहे आणि असायला हवा. हे नुसते राममंदिर नाही, भारतीय समाजमानसातील दृढ श्रद्धेनुसार ही रामजन्मभूमी आहे आणि त्यामुळेच तमाम भारतीयांसाठी ती परमपवित्र आहे. परंतु केवळ पुराणातील वानगी सांगणे पुरेसे नसते. या आदर्श महापुरुषाच्या चरित्रातून आपण काय शिकणार आहोत हे खरे महत्त्वाचे आहे. रामाने राज्य केले, ते रामराज्य म्हणून सत्ताकारणाचा युगानुयुगे मानदंड ठरले. आज देशाला या रामराज्याची प्रतीक्षा आहे. जेथे समता असेल, न्याय असेल, नीती असेल असे रामराज्य देशाला हवे आहे. द्वेषाऐवजी स्नेहाची पेरणी हवी आहे. त्यामुळे पंतप्रधान जेव्हा आपल्या कालच्या भाषणात म्हणाले की ‘राम सर्वत्र आहे, राम सर्वांचा आहे’ तेव्हा केवळ दैवत म्हणून नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठीचा एक महान प्रेरणास्त्रोत म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले पाहिजे, हाच संदेश त्यातून व्यक्त झालेला आहे.