>> पीसीबीकडून केंद्रीय कराराची घोषणा
>> हसन, आमिर, वहाबला वगळले
पाकिस्तानचे जलदगती त्रिकुट हसन अली, वहाब रियाझ व मोहम्मद आमिर यांना पाकिस्तान क्रिकेट मंडळाने केंद्रीय करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. माजी कर्णधार सर्फराज अहमद याची ‘अ’ श्रेणीतून ‘ब’ श्रेणीत अवनती करण्यात आली आहे.
डावखुरा जलदगती गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी व कसोटी संघाचा कर्णधार अझर अली यांची ‘ब’ श्रेणीतून ‘अ’ श्रेणीत उन्नती झाली आहे. ‘अ’ श्रेणीत बाबर आझम याचादेखील समावेश आहे. या श्रेणीतील खेळाडूंना १.१ मिलियन (अंदाजी ६२०० युएस डॉलर्स) मिळतात. उदयोन्मुख खेळाडूंसाठी नवीन ‘इमर्जिंग श्रेणी’ पीसीबीने तयार केली आहे. या श्रेणीत हैदर अली, मोहम्मद हसनैन व हारिस रौफ यांना स्थान देण्यात आले आहे. द्रुतगती गोलंदाज नसीम शाह याचा प्रथमच करारबद्ध खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला असून त्याला ‘क’ श्रेणीत स्थान मिळाले आहे. बाबर आझम याची वनडे व टी-ट्वेंटी संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या कसोटी संघाचा महत्त्वाचा घटक असलेला लेगस्पिनर यासिर शाह याची ‘अ’ श्रेणीतून ‘ब’ श्रेणीत घसरण झाली आहे. डावखुरा सलामीवीर इमाम उल हक याला ‘ब’ श्रेणीतून ‘क’ श्रेणीत ढकलण्यात आले आहे. २०१९च्या सुरुवातीपासून ५ कसोटींत ७५च्या सरासरीेने केवळ १० बळी घेतल्याचा फटका यासिरला बसला आहे. ‘ब’ श्रेणीत सर्फराजसह असद शफिक, हारिस सोहेल, मोहम्मद अब्बास व शादाब खान यांचा समावेश आहे. आबिद अली, मोहम्मद रिझवान व शान मसूद यांनी ‘क’ श्रेणीतून ‘ब’ श्रेणीत बढती मिळविली आहे. ‘ब’ श्रेणीतील खेळाडूंना अंदाजे ४७०० युएस डॉलर्स मिळतात. ‘क’ श्रेणीत नसीम, इफ्तिखार अहमद, फखर झमान, इमाद वासिम, इमाम व उस्मान शिनवारी यांचा समावेश आहे. या श्रेणीतील खेळाडूंना अंदाजे ३४०० युएस डॉलर्स मिळतात. १ जुलै २०२० ते १ जून २०२१ हा या कराराचा कालावधी असेल. या गुणवत्ता-आधारित केंद्रीय कराराच्या यादीचे तत्वज्ञान आणि निकष सोपे आणि सरळ होते, निवडकर्त्यांनी मागील १२ महिन्यांमधील खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेतला आणि त्यानंतर येणार्या १२ महिन्यांत आमच्या संघाच्या गरजेनुसार खेळाडूंची निवड केली, असे संघाच्या निवड समितीचे प्रमुख आणि मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक यांनी
खेळाडूंच्या निवडीबद्दल बोलताना सांगितले.